नवी मुंबई : केंद्रातील भाजपा सरकारकडून भारतीय संविधानाला धक्का लावण्याचे प्रयत्न होत असल्याचा विरोधकांकडून अप्रचार केला जात आहे; परंतु यात तथ्य नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भारतीय संविधानाला अधिक बळकटी मिळाल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.रिपाइंच्या दिघा येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते पार पडले, त्या वेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जातीवादी असल्याचा आरोप केला जात आहे. हा आरोपसुद्धा बिनबुडाचा आहे. कारण मोदी यांनी मागील पाच वर्षांत गोरगरिबांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत.इंदू मिलच्या जागेवरील स्मारक, दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराचे स्मारक, लंडन येथील घर, बाबासाहेबांची जन्मभूमी महू येथील स्मारकाची निर्मिती केली, तसेच २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून जाहीर केला. त्यामुळे मोदी यांना जातीवादी ठरवणे योग्य नसल्याचे या वेळी आठवले म्हणाले. प्रकाश आंबेडकर हे माझे विरोधक नाहीत, केवळ समाजाचे ऐक्य महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. रिपाइंचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.या वेळी रिपाइंचे कार्याध्यक्ष सुमंतराव गायकवाड, अण्णासाहेब रोकडे, नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते, यशपाल ओहोळ, युवक अध्यक्ष विजय कांबळे आदी उपस्थित होते.
भारतीय संविधानाला कोणताही धोका नाही- रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 11:42 PM