वाहतूक पोलिसांचे ‘पालथ्या घड्यावर पाणी’, नवी मुंबईकरांवर कारवाईचा धाकच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 11:43 PM2021-02-22T23:43:44+5:302021-02-22T23:44:02+5:30

रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई केल्या जात आहेत.

There is no fear of action against Navi Mumbaikars | वाहतूक पोलिसांचे ‘पालथ्या घड्यावर पाणी’, नवी मुंबईकरांवर कारवाईचा धाकच नाही

वाहतूक पोलिसांचे ‘पालथ्या घड्यावर पाणी’, नवी मुंबईकरांवर कारवाईचा धाकच नाही

Next

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : कारवाई व जनजागृती करूनही वाहनचालकांमध्ये बेशिस्तपणाचे दर्शन घडत आहे. चौकांमध्ये वाहतूक पोलीस दिसल्यावरच दिखाव्यासाठी नियमांचे पालन होत आहे. अन्यथा सिग्नल तोडण्यासह इतरही नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. 

रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई केल्या जात आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वर्षाला पाच लाखांहून अधिक वाहनचालकांवर वेगवेगळ्या कलमांतर्गत कारवाई होत आहे. त्याशिवाय प्रतिवर्षी रस्ते सुरक्षा अभियान राबवून नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व पटवून दिले जाते.

यंदा संपूर्ण महिना रस्ते सुरक्षा अभियान राबवून वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. मात्र, हे अभियान म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी असल्याची टीका सर्वसामान्यांकडून होत आहे. वाहतूक पोलिसांकडून कारवाई व जनजागृती करूनदेखील वाहनचालकांना शिस्त लागत नसल्याचाही संताप व्यक्त होत आहे.

नवी मुंबईसह पनवेल व उरण परिसरात हे चित्र पाहायला मिळत आहे, तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक रिक्षा, दुचाकी व खासगी कार यासह अवजड वाहनचालकांचाही समावेश दिसून येत आहे. त्यांच्या बेशिस्तपणाचा त्रास हा सर्वसामान्यांना देखील सहन करावा लागत आहे. त्यातूनच छोट्या मोठ्या अपघाताच्या घटनादेखील घडत आहेत. त्यामुळे अशा बेशिस्त चालकांचे करायचे तरी काय, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. 

बहुतेक अपघात हे वाहन वेगात पळविल्याने होतात. अशा प्रकारात एकाच्या चुकीमुळे दुसऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. लेनची शिस्त न पाळल्याने कोंडी होते; परंतु कारवाई अथवा जनजागृती करूनदेखील अनेकजण दक्ष नागरिक बनत नाहीत.     -  विजय दोंदे. 

बेशिस्त वाहनचालकांमुळे इतरांच्याही जीविताला धोका उद्भवतो. अशा चालकांनी स्वतः जगावे आणि इतरांनाही जगू द्यावे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताचा धोका टळू शकतो. प्रत्येकजण जागरूक झाल्यास अपघातांचे प्रमाण नक्कीच घटेल.     - मनोहर सावंत

Web Title: There is no fear of action against Navi Mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.