कळंबोली : खांदा वसाहतीत मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण नाही. त्यामुळे येथील मुलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. मुलांना रस्त्यावर खेळावे लागत आहे. परिणामी अपघाताची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरातील रहिवाशांना क्रीडांगणासाठी भूखंड उपलब्ध करावा, अशी मागणी रहिवाशांनी सिडकोकडे केली आहे.खांदा वसाहतीची लोकवस्ती लाखांच्याही पुढे गेली आहे. नवीन पनवेल नोडचाच एक भाग असलेल्या या वसाहतीत अनेक पायाभूत सुविधांचा वाणवा आहे. खांदा वसाहतीत क्रीडांगणाचा पूर्णपणे अभाव आहे. या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र आणि हक्काचे असे मैदान नाही. मोकळ्या भूखंडांवर इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. सेक्टर ८ येथील मोकळ्या जागेत सिडकोचा गृहनिर्माण प्रकल्प उभा राहत आहे. त्यामुळे सार्वजनिक उपक्रम, तसेच कार्यक्रमासाठी या परिसरातील रहिवाशांना जागेची शोधाशोध करावी लागत आहे.मुलांनी खेळायचे कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यासाठी सिडकोने नियोजन करावे आणि वसाहतीत सुसज्ज असे क्रीडांगण विकसित करावे, अशी रहिवाशांची मागणी आहे. शारीरिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही सुविधा देणे क्रमप्राप्त असल्याचे मत स्थानिक नगरसेविका सीता पाटील यांनी व्यक्त केले. या विभागातील मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी सिडकोकडे केली आहे.खांदा वसाहतीत महात्मा स्कूल, न्यू होरायझन, रेयान इंटरनॅशनल तसेच पिल्लेज ग्लोबल अॅकॅडमी या शाळा आहेत.सिडकोने या शिक्षण संस्थांना क्रीडांगणासाठी जागा दिली आहे.शाळा सुटल्यानंतर तसेच सुट्टीच्या दिवशी ही मैदाने स्थानिक मुलांसाठी खुली करून देणे बंधनकारक आहे.अनेक शिक्षण संस्थांनी नियमाला फाटा देत मैदानाला कुलूप ठोकले आहे. त्यामुळे स्थानिक मुलांची परवड होत आहे.
खांदा वसाहतीत मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगणच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 1:21 AM