आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसीन नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 02:39 AM2018-05-17T02:39:25+5:302018-05-17T02:39:25+5:30

रायगडातील आरोग्यविषयक यंत्रणा सुधारण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसीन यंत्रणा महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली होती.

There is no telemedicine in the health centers | आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसीन नाहीच

आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसीन नाहीच

Next

अरूणकुमार मेहेत्रे 
कळंबोली : रायगडातील आरोग्यविषयक यंत्रणा सुधारण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसीन यंत्रणा महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली होती. मात्र, ती हवेतच विरली आहे. अद्याप कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत, त्यामुळे रुग्णांना अत्याधुनिक सुविधा मिळण्यास विलंब होत आहे.
रायगड जिल्हा विस्ताराने मोठा असून, एकूण १५ तालुके आहेत. पनवेलचा अपवाद वगळता इतर तालुके ग्रामीणबहूल आहेत. ग्रामीण भाग जास्त असल्याने या ठिकाणी वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. याकरिता शहरी भागातील दवाखाने गाठावे लागतात. अनेकदा मुंबईही रुग्णांना गाठावी लागत असल्याने पैसा, वेळ खर्ची पडतो. ग्रामीण भागात आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना सुविधा दिली जाते; परंतु त्यामध्ये अनेक मर्यादा येतात त्याचबरोबर तज्ज्ञांचा वैद्यकीय सल्ला मिळत नाही. त्याकरिता शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्याचा कल सध्या आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून रायगड जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात टेलिमेडिसीन यंत्रणा सुरू करण्याच्या घोषणा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली होती. राज्याच्या आरोग्य विभागाने रायगडातील नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, याकरिता टेलिमेडिसीनची सोय करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले होते. दूरस्थ भागातील डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे प्रगत माहिती तंत्रज्ञान दूरसंचार यंत्रणा म्हणजे टेलिमेडिसीन होय.
दूरध्वनी व इंटरनेट यासारख्या माध्यमांचा वापर करून आरोग्य केंद्रातून रोगनिदान तंत्र केंद्र यांच्याशी संपर्क साधून रु ग्णांना अतिजलद व गुणवत्ताप्रधान आरोग्यसेवा पुरविण्यात येते. उपचारांसाठी टेलिमेडिसीन ही उपकारक अशी उपचारपद्धती आहे. आरोग्यसेवेची सहज उपलब्धता व जलद सेवापुरवठा याकरिता ही उपयोगी पद्धती असल्याचा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र, रायगड जिल्ह्यात अलिबाग आणि माणगाव वगळता इतर ठिकाणी ही सुविधा सुरू झाली नाही. आरोग्य विभागाकडून उदासीनता दिसून येत आहे.
>आरोग्य केंद्र ठरणार आरोग्यवर्धक
रायगड जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. विविध आजाराबाबत टेलिमेडिसीनच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ले घेता येतील. त्यानुसार औषधोपचारसुद्धा करता येणार आहे. याकरिता ही यंत्रणा बसविली तर शहरात जाण्याची गरज भासणार नाही किंवा खासगी रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. संबंधित यंत्रणांमुळे गरीब गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करता येईल. मात्र, ही यंत्रणा बसविण्यात आलेली नाही.
>जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलिमेडिसीनची सोय करण्याचा प्रस्ताव आहे. पालकमंत्री महोदयांनी तशी घोषणा केली होती. दोन रुग्णालयात ही सेवा सुरू आहे. मात्र, इतर ठिकाणी टेलिमेडिसीनची व्यवस्था नाही. त्याबाबत अद्याप तरी आमच्याकडे वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आले नाही; परंतु ही यंत्रणा भविष्यात कार्यान्वित होईल व रुग्णांना अत्याधुनिक सुविधा मिळेल.
- नितीन देसाई,
जिल्हा आरोग्य अधिकारी रायगड

Web Title: There is no telemedicine in the health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.