शहरात अजूनही नोटबंदीचे सावट
By admin | Published: November 16, 2016 04:52 AM2016-11-16T04:52:07+5:302016-11-16T04:52:07+5:30
आठवडा उलटूनही शहरातील बँकांबाहेरील रांगच रांग पाहायला मिळत आहे. जुन्या नोटा बदल्यासाठी तसेच खात्यात पैसे जमा
नवी मुंबई : आठवडा उलटूनही शहरातील बँकांबाहेरील रांगच रांग पाहायला मिळत आहे. जुन्या नोटा बदल्यासाठी तसेच खात्यात पैसे जमा करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढत आहे. सुटीचा वार देखील नागरिकांनी रांगेत उभे राहूनच काढला. वाढत्या रांगांवर नियंत्रण म्हणून बँकेच्या सुरक्षा रक्षकांमध्येही वाढ करण्यात आली आहे. गर्दीवर नियंत्रण आणत बँकेच्या आत गर्दी होणार नाही याची दक्षता घेत आहे. मोजक्याच ग्राहकांना आत सोडले जात असून अनावश्यक गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या स्कूल बस वाहतूकदारांना नोटबंदीचा मोठा फटका बसत आहे. एका बस मालकाकडे किमान तीन-चार बसेस असून या बसचा इंधन खर्च, इतर दुरुस्ती, साफसफाईसाठी दिवसाला १० हजारांहून अधिक रक्कम खर्च होत असल्याने एवढा पैसा आणायचा तरी कुठून, असा प्रश्न उपस्थित केला आहे. (वार्ताहर)एटीएम केंद्रातही गर्दी
जी एटीएम केंद्रे सुरू आहेत त्या एटीएम केंद्रातून पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी ठिकठिकाणी रांग लावल्याचे दिसून येते. नवीन नोटांच्या टंचाईमुळे काही बँकांच्या एटीएम केंद्रांचे शटर अजूनही बंदच ठेवण्यात आले आहे. बँकेतील रांग टाळण्यासाठी एटीएमचा वापर करू इच्छिणारे ग्राहक एटीएम केंद्राबाहेर रांगांनी त्रस्त झाले आहेत.
वीज महावितरणचा ग्राहकांना दिलासा-
वीजबिल भरण्यासाठी महावितरण विभागाकडून गुरुवारी २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. घरगुती आणि वैयक्तिक ग्राहकांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जेवढे वीजबिल, तेवढ्याच पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. ग्राहकांची गैरसोय होऊ नये याकरिता महावितरणची वीज भरणा केंद्रे सुरू राहणार असल्याची माहिती महावितरण विभागाने दिली आहे. वीजग्राहकांना त्वरित बिल भरता यावे यासाठी आवश्यक पूर्वतयारीसह राज्यातील सर्वच केंद्रांवर कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी तसेच ग्राहकांना अर्ज भरून देण्यासाठी वीजबिल भरण्यासाठी सहकार्य करतील. वीजबिल भरण्यासाठी आगाऊ स्वरूपात रक्कम स्वीकारली जाणार नसल्याचाही खुलासा महावितरण विभागाने केला आहे.