मधुकर ठाकूर
उरण : दुपारी नेरूळहून उरण स्थानकाकडे निघालेली लोकल खारकोपर ते रांजणपाडा स्थानका दरम्यान अचानक थांबली होती.सिग्नल नसतानाही थांबलेल्या लोकलमुळे उरण स्थानकावर पोहचण्यासाठी प्रवाशांना १२ ते १३ मिनिटे विलंब झाला.कोणतेही कारण नसतानाही लोकल का थांबली याबाबत प्रवाशांमध्ये काही मिनिटांसाठी घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
नेरूळ - उरण मार्गावर धावणारी सोमवारी (१) दुपारची १.४८ ची लोकल नेरूळ स्थानकावरुन वेळेत सुटली होती.उरण स्थानकाकडे निघालेली ही लोकल खारकोपर ते रांजणपाडा स्थानका दरम्यान अचानक थांबली.सिग्नल नसतानाही १२-१३ मिनिटे अचानक थांबलेल्या या लोकलमुळे प्रवाशांच्या मनात अनेक शंका कुशंकांचे काहूर माजले होते.प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरणही निर्माण झाले होते.अखेर थांबलेली लोकल मार्गस्थ झाली आणि १२ -१३ मिनिटे उशिराने उरण स्थानकात दाखल झाली. त्यानंतर प्रवाशांनीही सुटकेचा निःश्वास टाकला.
काही प्रवाशांनी उरण स्थानकावर उतरल्यानंतर स्टेशन मास्तरांना कारण विचारण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यांनाही स्टेशन मास्तरांकडून त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मात्र याबाबत अधिक माहिती घेतली असता रेल्वे प्रशासनाकडून काही सावधगिरीच्या सुचना दिल्या असल्याच्या शक्यतेमुळे लोकल थांबविण्यात आली असावी.तसेच काही वेळा मोटारमन किंवा गार्डना रेल्वे इंजिन बिघाड होण्याचा संशय आल्याने अथवा अन्य संशयित कारणांची खातरजमा करून घेण्यासाठी लोकल थांबविण्यात येते.तसाच प्रकार घडला असावा असे स्टेशन डायरीवरुन तरी वाटते.मात्र याची चौकशी करून अधिक माहिती घेतली जाणार असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.मात्र जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने नेमक्या कारणांची मीमांसा झाली नाही.