नवी मुंबई : तुर्भेमधील राज्य परिवहन विभागाच्या भूखंडावरील अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतरही अद्याप येथील लाकडी खोके उचलण्यात आली नसून अनधिकृत पार्किंगची समस्याही जैसे थे आहे.सिडकोने राज्य परिवहन विभागाला फळ मार्केटच्या जावक गेटसमोरील भूखंड डेपोसाठी उपलब्ध करून दिला आहे. येथे छोटे कार्यालय उभारून काही बसेस येथून सुरू करण्यात आल्या होत्या; परंतु मागील काही वर्षांपासून डेपोचा वापर पूर्णपणे थांबला आहे. फळ विक्रेत्यांना लाकडी खोकी पुरविणाºया विक्रेत्यांनी या भूखंडावर व्यवसाय सुरू केला आहे. खोके निर्मितीपासून त्याचा साठा येथे केला जात आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी २२ एप्रिलला येथे भेट दिली. अतिक्रमण पाहून सर्वांना धक्का बसला होता. तत्काळ एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संबंधितांविरोधात तक्रार नोंदविण्यात आली होती. तत्काळ अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली होती. दुसºया दिवशी सर्व भूखंड अतिक्रमणमुक्त करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.गुन्हा दाखल करूनही अद्याप परिवहन विभागाच्या भूखंडावरील अतिक्रमण थांबलेले नाही. सर्व विक्रेत्यांनी पूर्ववत व्यवसाय सुरू केला आहे. हजारो लाकडी खोक्यांचा येथे साठा करून ठेवला आहे. अनधिकृतपणे ५० पेक्षा जास्त वाहने या भूखंडावर उभी केली जात आहेत. भूखंड अतिक्रमणमुक्त करायचा नव्हता तर कारवाईचा दिखावा कशासाठी केला असे मतही परिसरातील नागरिक व्यक्त करत असून एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या हेतूवरही शंका उपस्थित केली जात आहे.
परिवहनच्या भूखंडावरील अतिक्रमण जैसे थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 1:14 AM