दिवा येथे डेब्रिज टाकून मैदानावर अतिक्रमण; झाडांची कत्तलही केली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 03:44 PM2023-03-20T15:44:21+5:302023-03-20T15:45:02+5:30
या ठिकाणच्या झाडांची कत्तल करून तेथील जागेचा वापर मंडप डेकोरेटर्स चालक गोदामासाठी करीत आहे
नवी मुंबई : ऐरोली विभाग कार्यालयात मोडणाऱ्या दिवा कोळीवाडा परिसरात एका मंडप डेकोरेटर्स चालकाने मैदानात अतिक्रमण केले असतानाच त्याठिकाणी आता भंगार आणि डेब्रिज ही टाकण्यात येत आहे. हा एक प्रकारे भूखंड हडपण्याचा प्रकार असल्याची तक्रार ऐरोली सोशल सर्व्हिस या युजरने छायाचित्रासह समाजमाध्यमांवर केली आहे.
या ठिकाणच्या झाडांची कत्तल करून तेथील जागेचा वापर मंडप डेकोरेटर्स चालक गोदामासाठी करीत आहे. त्याठिकाणी मंडपासह तत्सम सामान ठेवण्यात येत आहे. मागे महापालिका आणि सिडकोने थातुरमातुर कारवाई केली. परंतु, आता पुन्हा तेथे डेब्रिज टाकण्यात येत आहे. तर काही माफियांनी पडदे टाकून भूखंड हडपने सुरूच ठेवले आहे. शिवाय एका टरबूज विक्रेत्याने ही तेथे आपले दुकान थाटले असून त्याच्याकडून स्थानिक भाडे वसूल करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या अतिक्रमणाकडे नवी मुंबई महापालिका, सिडको यांचे दुर्लक्ष झाले आहे. या प्रकाराकडे संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केल्यास परिसरात मोठ्या प्रमाणात झोपड्या उभ्या राहून स्थानिक गावकरी मैदानास मुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.