ते भेटले, वाद झाला अन् तिची हत्या; तरुणाने खाडीत मारली उडी, एनआरआयमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 12:45 PM2024-08-09T12:45:34+5:302024-08-09T12:46:17+5:30
भाविका शिकत होती, तर सात्त्विक नोकरी करत होता. ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध झाले होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून दोघे वेगळे झाल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू होता. त्यातूनच मंगळवारी दोघेही एकमेकांना भेटले होते.
नवी मुंबई : मैत्रिणीची हत्या करून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास एनआरआय परिसरात घडली. पोलिसांना तरुणीचा मृतदेह सापडला. मात्र, तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशीही मिळाला नाही. भाविका मोरे (१९) असे मृत तरुणीचे नाव असून, ती सीवूड परिसरात राहणारी आहे. तिची सोशल मीडियाद्वारे दोन वर्षांपासून सात्त्विक पाटील याच्यासोबत ओळख झाली होती.
भाविका शिकत होती, तर सात्त्विक नोकरी करत होता. ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध झाले होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून दोघे वेगळे झाल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू होता. त्यातूनच मंगळवारी दोघेही एकमेकांना भेटले होते.
बुधवारीसुद्धा सात्त्विकने भाविकाला डीपीएस शाळेच्या मागील निर्मनुष्य ठिकाणी भेटण्यासाठी बोलावले होते. तिथे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला असता सात्त्विकने गळा आवळून भाविकाची हत्या केली. त्यानंतर नाल्यात तिचा मृतदेह टाकून डोक्यावर लादी टाकली होती. भाविकाच्या हत्येनंतर सात्त्विकने काही अंतरावरच असलेल्या पुलावरून खाडीत उडी मारली.
यावेळी तेथे मासेमारी करणाऱ्या काहींनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा दबाव जास्त असल्याने तो वाहून गेला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. गुरुवारीही खाडीलगतच्या भागात त्याच्या मृतदेहाचा पोलिसांनी शोध घेतला. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.
सोशल मीडियाद्वारे भाविका व सात्विक एकमेकांच्या संपर्कात होते. चार महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. बुधवारी दोघे भेटले असता झालेल्या भांडणातून सात्त्विकने गळा आवळून भाविकाची हत्या केली. त्यानंतर त्याने खाडीत उडी मारली. त्याचा शोध सुरू आहे.
- पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त