- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : व्हिसाची मुदत संपल्यानंतरही नवी मुंबईच्या विविध भागांत बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या ७५ नायजेरियन नागरिकांची नवी मुंबई पोलिसांनी विशेष कोम्बिंग ऑपरेशनद्वारे धरपकड केली. यापैकी अनेकांवर गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली. या गुन्ह्यांचा निकाल लागेपर्यंत दोषी परदेशींना देश सोडता येणार नाही, असे विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी स्पष्ट केले.
भारतात अशा बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या इतर देशातील व्यक्तींच्या शोधासाठी मोहीम राबविण्याच्या सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केलेल्या आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात शुक्रवारी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये परिमंडळ १ मध्ये तीन ठिकाणी तर परिमंडळ २ मध्ये तीन ठिकाणी विदेशी नागरिकांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांवर धाडी टाकल्या. यात ७५ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांच्यापैकी काहींवर गुन्हे दाखल केले आहेत.