नवी मुंबई : नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर करावे येथील खाडीकिनारच्या काही झोपड्यांबाबत कथित पर्यावरणप्रेमींनी ज्या तक्रारी केल्या आहेत, त्या अपूर्ण माहितीवर आधारित आहेत. ही जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील असून, स्थानिक मच्छीमार आणि शेतकऱ्यांनी तेथे बांबू आणि ताडपत्री टाकून तात्पुरत्या ज्या झोपड्या बांधल्या आहेत, त्या शेतीची अवजरे ठेवण्याठीच्या आहेत. तेथे कोणतेही पक्के अनधिकृत बांधकाम केलेले नाही. यामुळे त्यांच्यावर कारवाई केल्यास मच्छीमार आणि शेतकऱ्यांवर ते अन्यायकारक ठरणार असल्याने या झोपड्यांवर कारवाई करू नये, असे पत्र करावे गाव गावठाण विस्तार समितीने महापालिका आयुक्तांना दिले आहे.
विशेष म्हणजे करावेतील ज्या जमिनी सिडकोने संपादित केल्या होत्या, तिथे असंख्य टोलेजंग इमारती उभ्या आहेत. यातील अनेक इमारती या सीआरझेड क्षेत्रासह विमानतळ फनेल झोनमध्ये आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी आमच्या जमिनींविषयी कोणतीही माहिती नसलेल्या लोकांच्या तक्रारीवरून महापालिका या तात्पुरत्या झोपड्या तोडण्यासाठी जेसीबी घेऊन येते. हे आमच्यावर अन्यायकारक आहे. यामुळे महापालिकेने आमच्या झोपड्या तोडू नयेत, अशी मागणी करावे गाव गावठाण विस्तार समितीने केली आहे. तसा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या समितीने दिला आहे.