लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरात वाहनचोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. प्रतिवर्षी हजारो वाहने नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रातून चोरीला जात आहेत. मात्र, वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण अल्प असल्याने ही वाहने जातात कुठे, असा प्रश्न पडत असतो.
नवी मुंबईस पनवेल परिसरात वाहनचोरीचे गुन्हे पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत. सर्वत्र वाहन पार्किंगची योग्य खबरदारी घेतली जात नसल्याने रस्त्यावर, सोसायटी आवारात वाहने उभी केली जात आहेत. अशा वाहनांवर पाळत ठेवून चोरट्यांकडून ती बनावट चावी अथवा लॉक तोडून पळवली जात आहेत. त्यात दुचाकी, कार यांच्यासह रिक्षांचादेखील समावेश दिसू लागला आहे. चालू वर्षातदेखील सुमारे साडेतीनशे वाहने चोरीला गेली आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ४५ ते ५० गुन्हे या चार महिन्यांत उघड झाले आहेत. त्यात शहराबाहेरील टोळ्यांचा सर्वाधिक हात समोर आला आहे.
वाढत्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निर्देशानुसार स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून कसून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेतली जात आहे. वाहनचोरी घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही तपासून संशयितांचा आलेल्या व गेलेल्या मार्गाचा आढावा घेतला जात आहे. त्यातून काही टोळ्या पोलिसांच्या हातीदेखील लागल्या आहेत. शहरात वाहन पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
पन्नासहून अधिक वाहने हस्तगत मागील दीड महिन्यात नवी मुंबई पोलिसांनी काही वाहनचोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हे शाखेसह परिमंडळ पोलिसांच्या पथकाने या कारवाया केल्या आहेत. त्यातून सुमारे ५० वाहने हस्तगत केली असून, त्यात दुचाकी, कार व रिक्षांचा समावेश आहे.