सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : वेगवेगळ्या आमिषाला बळी पडल्याने फसवणूक होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. तरुणांपुढील बेरोजगारी दूर करण्याची तसेच मध्यमवर्गीयांना झटपट श्रीमंतीची भुरळ घातली जात आहे. यामध्ये अनेक टोळ्यांचा समावेश असून, त्यांच्याकडून वर्षभरात १४ हजारांहून अधिकांची फसवणूक झाली आहे.सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईकडे मुंबईला पर्यायी शहर म्हणून पाहिले जात आहे. यामुळे नवी मुंबईत उपलब्ध होत असलेल्या नोकऱ्यांची संधी मिळवण्यासह शहरात घर घेण्यास इच्छुक असणाºयांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. याच संधीचा फायदा काही दलाल व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून घेतला जात आहे. त्याकरिता मोठमोठी कार्यालये थाटून त्यांना जाळ्यात ओढले जात आहे. त्यानुसार गतवर्षात १४ हजारहून अधिकांना आपली जमापुंजी गमवावी लागली आहे. त्यामध्ये घरखरेदीच्या बहाण्याने, विदेशी नोकरीच्या बहाण्याने, जादा नफ्याचे आमिष दाखवून तसेच पर्यटनाच्या बहाण्याने झालेल्या फसवणुकींचा समावेश आहे. या प्रकरणी काहींना पोलिसांनी अटकही केली असून, विकासकांसह बनावट मार्केटिंग कंपन्यांच्या संचालकांचाही समावेश आहे.उच्चशिक्षित तरुणांपुढेही सध्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे परदेशी उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधी व मिळणारा भरघोस पगार याकडे ते मोहित होत आहेत. याच संधीचा फायदा घेऊन त्यांच्या गंडवण्याच्या उद्देशाने कार्यालये थाटली जात आहेत. त्यांच्याकडून उच्चशिक्षित तरुणांना शिपिंगमध्ये अथवा वेगवेगळ्या देशात नोकरीला लावण्याचे आश्वासन देऊन लाखो रुपये उकळले जातात. त्यानंतर मात्र काही दिवसांतच कार्यालय गुंडाळून पळ काढला जात आहे. नवी मुंबईत अशा प्रकारचे १५ हून अधिक गुन्हे दाखल असून, त्यामध्ये सुमारे १५० तरुणांची फसवणूक झालेली आहे. तर मध्यमवर्गीयांना झटपट श्रीमंतीचे स्वप्न दाखवून त्यांनाही गंडवणाºया कंपन्या शहरात सक्रिय आहेत. त्यामध्ये देश-विदेशात तयार झालेल्या मार्केटिंग कंपन्यांचा समावेश आढळून आलेला आहे.आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करून कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी नसताना अशा कंपन्यांकडून पाच ते दहा हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांच्या ठेवी घेतल्या जात आहेत, याकरिता जादा नफ्याचे तसेच वेगवेगळ्या बक्षिसांची प्रलोभने दाखवली जात आहेत; परंतु ठरावीक कालावधीनंतर सर्व गुंतवणूकदारांच्या ठेवी हडप करून संचालकांकडून पळ काढला जातो. मागील दोन दशकांत नवी मुंबईसह राज्यात असे अनेक प्रकार घडले आहेत. त्यानंतरही फसव्या आमिषाला बळी पडून गुंतवणूक केली जात असल्याने २०१९ मध्ये सुमारे १२ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकरणात फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या उशिरा लक्षात येत असल्याने, तोपर्यंत कंपनीच्या संबंधितांनी पोबारा केलेला असतो. यामुळे गतवर्षात पोलिसांनी स्वत:हून अशा कंपन्यांचा शोध घेऊनही कारवाई केल्या आहेत.>सहलीच्या माध्यमातूनही फसवणूकरोजच्या धकाधकीच्या जीवनातून क्षणभर विश्रांतीसाठी प्रत्येक जण देश-विदेशात सहलीला प्राधान्य देत असतो, त्यानुसार काही जण रोजच्या खर्चात काटकसर करून विदेशात सहलीचा आनंद घेऊ पाहत आहेत. त्यांच्या या उत्साहातही विरजण घालून त्यांना फसवणाºया तोतया पर्यटन कंपन्याही शहरात सक्रिय आहेत. स्वस्तात हॉलिडे पॅकेजच्या बहाण्याने त्यांच्याकडून पैसे घेऊन प्रत्यक्षात कोणत्याही सहलीला न पाठवता फसवणूक होत आहे. तर पनवेलच्या काही व्यक्तींना चेन्नई मार्गे श्रीलंकेला पाठवले जाणार होते; परंतु सहलीचे पैसे घेऊनही कंपनीने त्यांना तिकिटे न दिल्याने या पर्यटकांना चेन्नई विमानतळावरच अडकून बसावे लागले होते.>स्वप्नातील घरांना घरघरशहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे नवी मुंबईसह पनवेल परिसरात स्वत:चे घर घेण्यास इच्छुक असणाºयांची संख्या वाढत आहे. याच संधीचा फायदा घेऊन त्यांना ठगवणारे दलाल व तोतये विकासकांसह सक्रिय झाले आहेत. त्यांच्याकडून गतवर्षात दीड हजारहून अधिक ग्राहकांची फसवणूक झाली आहे. मोठमोठ्या गृहप्रकल्पांचे कागदोपत्री आराखडे दाखवून प्रत्यक्षात प्रकल्प न उभारता ही फसवणूक होत आहे. अथवा अनधिकृत बांधकामे उभारून ती अधिकृत असल्याचे भासवून विकली जात आहेत, यामुळे अनेकांच्या स्वप्नातील घरांना घरघर लागली असून त्यांची जमापुंजीही अडकून पडली आहे.
सायबर सिटीत ठगांचे जाळे, कोट्यवधींचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 12:03 AM