चोरट्यांकडून एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 02:30 AM2019-07-31T02:30:41+5:302019-07-31T02:30:49+5:30

कोपरखैरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : सुरक्षारक्षक नसल्याचा घेतला फायदा; गॅसकटरचा वापर

Thieves try to break the ATM machine | चोरट्यांकडून एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न

चोरट्यांकडून एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न

googlenewsNext

नवी मुंबई : गॅसकटरने एटीएम मशिन कापून त्यामधील पैसे चोरण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार कोपरखैरणेत घडला आहे. बँक व एटीएमला सुरक्षारक्षक नसल्याची संधी साधून चोरट्यांनी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार केला. या प्रकरणी दोघांविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

कोपरखैरणे सेक्टर १९ येथील युनियन बँकेच्या एटीएममध्ये शनिवारी रात्री हा प्रकार घडला आहे. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी सोमवारी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनियन बँकेच्या शाखेला लागूनच असलेल्या एटीएमच्या ठिकाणीच ही घटना घडली आहे. तिथले एटीएम मशिन गॅसकटरने कापून फोडण्याचा प्रयत्न झाल्याची बाब रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यानुसार बँकेचे मॅनेजर प्रदीप साहू यांनी सोमवारी सकाळी तिथले सीसीटीव्ही तपासले असता, शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघांनी हा प्रकार केल्याचे उघड झाले. त्यांनी एटीएमच्या बाहेरील व आतील कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारल्यानंतर गॅसकटरने मशिन कापण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये त्यांना अपयश आल्याने तिथून पळ काढला.
बँकेच्या व एटीएमच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक नसल्याची संधी साधून त्यांनी एटीएममधील रक्कम लुटण्याच्या उद्देशाने प्रयत्न केला. जर यामध्ये त्यांना यश आले असते, तर मोठ्या प्रमाणात रक्कम चोरीला गेली असती. त्यानुसार अज्ञात दोघांविरोधात कोपरखैरणे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. देशभर गाजलेल्या जुईनगर येथील बडोदा बँकेवरील दरोड्यानंतर पोलिसांकडून सर्वच वित्त संस्थांना सुरक्षेच्या बाबतीत सूचना दिल्या आहेत. त्यानंतरही बँका व एटीएमच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यास चालढकल होत असल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे.
 

Web Title: Thieves try to break the ATM machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.