अवैध दारू साठ्याप्रकरणी तिसरा साथीदार अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 05:17 AM2019-07-20T05:17:49+5:302019-07-20T05:18:01+5:30
सव्वा कोटीच्या अवैध दारूसाठ्याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे.
नवी मुंबई : सव्वा कोटीच्या अवैध दारूसाठ्याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे. ज्या बंद कंपनीत ही दारू साठवण्यात आली होती, त्या कंपनी मालकाच्या नकळत हा प्रकार सुरू होता.
तुर्भे एमआयडीसीतील बंद कंपनीतील अवैध दारूसाठा पोलिसांनी जप्त केला होता. या प्रकरणी मुकेशकुमार यादव (४०) व सोनू श्रीवास्तव (३०) यांना अटक झाली होती. घटनास्थळी पोलिसांना राज्यात विक्रीसाठी परवानगी नसलेल्या मात्र सर्वाधिक मागणी असलेल्या दारूच्या ५५ हजार ५८४ बाटल्या जप्त केल्या होत्या. त्यांच्या चौकशीत इतर दोघांची नावे निष्पन्न झाली असून, त्यापैकी गणपत सोलंकी (४०) याला अटक करण्यात आली आहे. तर चौथा साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे. त्याने हा या बंद कंपनीत माल उतरवला. या कंपनीची जागा ग्रुप आॅफ गुप्ता कंपनीच्या सहा भावांच्या मालकीची आहे. त्यापैकी पाच भाऊ हयात नसून उर्वरित एकमेव मालक ८५ वर्षांचे आहेत. त्यांनी सदर जागा विकण्यासाठी एका कंपनीकडे अधिकार दिले आहेत. त्या सर्वांच्या नकळत त्या ठिकाणी ही दारू साठवण्यात आली होती.