तिसऱ्या आघाडीचा सूर
By admin | Published: August 3, 2015 03:24 AM2015-08-03T03:24:19+5:302015-08-03T03:24:19+5:30
डाव्या विचारांनी एकत्र येऊन जनतेला तिसरा पर्याय देणे गरजेचे आहे. या तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस
अलिबाग : डाव्या विचारांनी एकत्र येऊन जनतेला तिसरा पर्याय देणे गरजेचे आहे. या तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांनी करावे. डाव्या विचारांची ताकद त्यांच्या मागे उभी राहील, असा विश्वास शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. अलिबाग समुद्र किनारी शेकापचा ६८वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी आमदार पाटील बोलत होते.
अलिबाग शेतकरी भवन येथून शेकापच्या रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅली समुद्र किनारी आल्यावर तिचे सभेत रूपांतर झाले. ‘शेतकरी, कष्टकरी कामगारांचे नेतृत्व सीताराम येचुरी यांच्या रूपाने उदयास आले आहे. जनहिताचे कार्यक्रम आता त्यांच्या नेतृत्वाखाली आखले जातील,’ असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यात सहकार क्षेत्राच्या निवडणुकीत शेकापची ९० टक्के सत्ता आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत झोकून देऊन काम करा, असे आवाहन आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. देशात तिसरी आघाडी निर्माण व्हावी आणि त्याचे नेतृत्व सीताराम येचुरी यांनी करावे, त्याचप्रमाणे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा मृत्यू दिवस हा विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात यावा, या दोन मागण्या डाव्या विचारांच्या नेत्यांनी पूर्ण कराव्यात, अशी मागणी माजी आमदार विवेक पाटील यांनी केली.
बाळगंगा आणि हेटवणे धरणाचे पाणी सरकार व्यापारीकरणासाठी देत असेल, तर हा लढा डाव्या राजकीय पक्षांनी एकत्र लढला पाहिजे, असे आवाहन आमदार धैर्यशील पाटील यांनी केले. माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन प्रदीप नाईक यांनी केले. सीताराम येचुरी यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल शेकापच्या वतीने आमदार जयंत पाटील
यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी बाळाराम पाटील, आमदार
पंडित पाटील यांच्यासह अन्य मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)