- नामदेव मोरेनवी मुंबई - थिरीपुरा चिट फंड कंपनीने नवी मुंबईमध्येही मोठा घोटाळा केल्याचे निदर्शनास आले आहे. ५२ नागरिकांचे ५० लाख रुपये घेऊन व्यवस्थापन फरार झाले आहे. गुंतवणूकदार हतबल झाले असून, त्यांनी सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली आहे.चेन्नईमध्ये मुख्यालय असलेल्या थिरीपुरा चिट फंड कंपनीने सानपाड्यामधील जी स्क्वेअर बिझनेस पार्कच्या पाचव्या मजल्यावर कार्यालय घेतले होते. जवळपास पाच वर्षांपासून कंपनीने नवी मुंबईमध्ये एजंट नेमून छोट्या व्यावसायिकांकडून पैसे संकलित करण्यास सुरुवात केली होती. गुंतवणूकदारांना आकर्षक व्याज व कर्ज देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. रोज ८०० रुपये भरल्यास २० महिन्यांनंतर ५ लाख रुपये परतावा देण्यात येणार किंवा दोन महिने सलग पैसे भरल्यास ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येईल अशाप्रकारे जाहिरातबाजी करून गुंतवणूकदारांकडून पैसे घेण्यात आले होते. अनेक गुंतवणूकदारांनी कर्ज घेऊन त्याची परतफेडही केली होती. विश्वास ठेवून गुंतवणूकदार पैसे गुंतवत राहिले, परंतु फेब्रुवारी २०१८ मध्ये अचानक कंपनीने कार्यालय बंद केले आहे. कार्यालय बंद करण्यापूर्वी एजंटच्या माध्यमातून सर्वांची खातेपुस्तके जमा करून घेतली होती. यामुळे कंपनीने जाणीवपूर्वक फसवणूक करण्यासाठी व पुरावे नष्ट करण्यासाठी पद्धतशीरपणे कार्यपद्धती राबविल्याचा संशय गुंतवणूकदारांना आला व त्यांनी एकत्रित येण्यास सुरुवात केली.नवी मुंबईमधील जवळपास ५२ गुंतवणूकदार एकत्र आले आहेत. त्या सर्वांची तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. सर्वांची रकमेची नोंद असलेली पुस्तके व्यवस्थापनाने जमा करून घेतली आहे. या सर्वांनी निवेदन तयार करून १० जूनला सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये दिले आहे. फसवणूक झालेल्या सर्वांनी कंपनीची माहिती घेतली असता कंपनीच्या तीन मुख्य व्यवस्थापकांविरोधात मे २०१८ मध्ये चेन्नईमध्ये गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक झाल्याची माहिती मिळाली. या कंपनीने केरळ, तामिळनाडू, कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये शाखा उघडल्या होत्या.नवी मुंबईमधील गुंतवणूकदारही हतबल झाले आहेत. कष्टाने कमविलेले पैसे चिट फंड कंपनीमध्ये गुंतविले होते. गुंतवणूक फुकट गेलीच, शिवाय व्यवसायासाठी दुसरीकडे कर्ज काढण्याची वेळ अनेकांवर आली आहे. पोलिसांना दिलेल्या निवेदनामध्ये ५२ गुंतवणूकदारांनी त्यांची किती फसवणूक झाली याचा उल्लेख केला आहे. न्याय मिळावा अशी अपेक्षा गुंतवणूकदारांनी व्यक्त केली असून, पोलीस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्नचिट फंड कंपनीने गुंतवणूकदारांकडून पासबूक जमा करून घेतले आहेत. पुस्तके व संगणकातील नोंदी गायब करून पुरावेच नष्ट करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून कार्यालयातील साहित्य सील करावे, अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे.सानपाड्यामध्ये दुसरी घटनायापूर्वी सानपाड्यामध्ये फ्युजन इंटरनॅशनल कंपनीने पामबीच रोडजवळील टॉवरमध्ये कार्यालय थाटून हॉलिडे पॅकेजच्या नावाने नागरिकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली होती. जवळपास चारशे नागरिकांची फसवणूक झाली होती. याप्रकरणी गुंतवणूकदारांनी लढा दिल्यानंतर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती.चिट फंड कंपनीने फसवणूक केल्याची लेखी तक्रार गुंतवणूकदारांनी दिली आहे. संबंधित कंपनीविरोधात चेन्नईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याठिकाणी नवीन गुन्हा दाखल करायचा की त्याच गुन्ह्यामध्ये समावेश करायचा याविषयी पुढील कार्यवाही सुरू आहे.- सूरज पाडवी,वरिष्ठ पोलीस निरीक्षकसानपाडाथिरीपुरा चिट फंड कंपनीमध्ये प्रतिदिन ८०० रुपयांची गुंतवणूक करत होतो. दीड लाख रुपये जमा केले असून, पैसे परत मागितल्यानंतर टाळाटाळ करण्यात आली. फेबु्रवारीमध्ये कंपनीने सानपाड्यामधील कार्यालयाला टाळे लावले आहेत. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असून न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे.- राजेंद्र बडोले,गुंतवणूकदार
थिरीपुरा चिट फंड घोटाळा, ५२ नागरिकांना ५० लाखांना फसविले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 4:47 AM