धामोळे आदिवासी पाडा तहानलेला
By admin | Published: April 20, 2017 03:45 AM2017-04-20T03:45:34+5:302017-04-20T03:45:34+5:30
स्मार्ट सिटी म्हणून खारघर नावारूपाला येत आहे. सिडकोने त्या पद्धतीने या शहराचा विकास देखील केला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प, टोलेजंग इमारती
वैभव गायकर, पनवेल
स्मार्ट सिटी म्हणून खारघर नावारूपाला येत आहे. सिडकोने त्या पद्धतीने या शहराचा विकास देखील केला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प, टोलेजंग इमारती, अत्यंत नियोजनबद्ध असे चौक ही या शहराची ओळख आहे. मात्र या विकासात याठिकाणचा आदिवासी बांधव भरडला जात आहे. खारघरमधील धामोळे आदिवासी पाडा येथे मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना आदिवासी बांधवांना करावा लागत आहे. पाण्यासाठी महिला, पुरु ष साऱ्यांनाच पायपीट करण्याची पाळी आली आहे. गावातील विहिरी आटल्या आहे. डोंगरकपारीत खड्डे खोदून या आदिवासी बांधवांना आपली तहान भागवावी लागत आहे.
नवी मुंबई शहरातील सर्वात नियोजनबद्ध शहर असल्याचा खारघरमधील आदिवासी पाड्यात अशी दुष्काळसदृश स्थिती उद्भवली असल्याची कोणी कल्पना देखील करू शकत नाही. धामोळे आदिवासी पाड्याला लागूनच सिडकोचे महत्त्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फ कोर्स आहे. या आदिवासी पाड्यात जाताना या ठिकाणी बांधण्यात आलेल्या रस्त्यातूनच जावे लागते.
या प्रकल्पात दिवसभर गवताला ओलसर ठेवण्यासाठी पाण्याचे फवारे उडतात, मात्र धामोळेत थेंबभर पाण्यासाठी वणवण करावी लगते. गावात दोन विहिरी आहेत, मात्र त्याही आटल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. काही वर्षांपूर्वी गावात जलवाहिनी देखील टाकण्यात आली, मात्र त्या जलवाहिनीला पाणी नाही. धामोळे आदिवासी पाड्यात कातकरी वाडी व आदिवासी वाडी या दोन वाड्यांचा समावेश आहे. दोन्ही पाडे मिळून ७०० ते ८०० लोकवस्तीचे गाव आहे. मात्र शहराचा भाग असलेला आदिवासी पाडा विकासापासून कोसो दूर आहे. पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतीत या आदिवासी पाड्याचा समावेश होता.
खारघरमधील या आदिवासी पाड्यातील समस्येबद्दल पनवेल महानगर पालिकेचे विभागीय अधिकारी श्रीराम हजारे यांना विचारणा केली असता पाण्याची समस्या गंभीर असल्याचे मान्य करीत लवकरच याठिकाणी पाणीपुरवठा सुरू केला जाईल असे त्यांनी सांगितले.
आम्ही आदिवासी आहोत हा आमचा गुन्हा आहे का? आमच्या नजरेदेखतच लाखो लिटर पाणी या गवतावर मारले जाते. मात्र आम्हाला डोंगरदऱ्यातून खड्डे खोदून तसेच काही वेळा चोरून पाणी आणावे लागते. आमच्या नजरेदेखत शहराचा कायापालट झाला, मात्र आम्हाला आजवर मुबलक पाणी मिळत नाही. निवडणुकांच्या वेळी अनेक आमिषे दाखवून आमची मते घेतली जातात त्यानंतर याठिकाणी पुन्हा ढुंकूनही पाहत नाही. आमची पाणी समस्या दूर झाली नाही तर आम्ही येणाऱ्या सर्वच निवडणुकांवर बहिष्कार घालू अशी प्रतिक्रि या काळीबाई पारधी या वृद्ध महिलेने दिली.
धामोळे आदिवासी पाड्यात भीषण पाण्याची समस्या आहे. शहरी भागात काही तासापुरता पाणीपुरवठा खंडित झाला तर रहिवासी रस्त्यावर उतरतात. अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देतात. मात्र हे आदिवासी अशिक्षित असल्याने अनेक वर्षे पाण्याच्या या समस्येबाबत चकार शब्द देखील काढत नाही. दाद मागायची कोणाकडे हा प्रश्न या आदिवासी बांधवांना पडतो. मात्र ही समस्या गंभीर आहे, आम्ही आता गप्प बसणार नाही. याठिकाणी राहत असलेल्या शेकडो आदिवासी बांधवांना घेऊन आम्ही सिडको व पालिका कार्यालयावर धडक देणार असल्याची प्रतिक्रि या आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष गणपत वारगडा यांनी दिली.