ऐरोली, घणसोली परिसरात तुंबलेल्या गटारांमुळे स्वच्छता अभियानाचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 12:59 AM2021-01-08T00:59:31+5:302021-01-08T00:59:37+5:30
पालिकेचे दुर्लक्ष; विद्युत केबल असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई – ऐरोली आणि घणसोली विभागांत गटारांची पार दुरवस्था झाल्याचे चित्र सध्या दिसते आहे. स्वच्छता अधिका-यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांना नाकतोंड दाबून घाणीच्या साम्राज्यातून जावे लागत आहे. त्यामुळे स्वच्छता विभागाचे तीनतेरा वाजले आहेत.
तसेच उघड्या गटारांतूनच विद्युतकेबल गेल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घणसोली विभाग कार्यक्षेत्रात गोठिवली, तळवली, रबाले मशेश्वरनगर, घणसोली गावठाणातील म्हात्रेआळी, चिंचआळी, कौलआळी, समर्थनगर, गावदेवीवाडी, अर्जुनवाडी तसेच आदिशक्तीनगर, तर ऐरोली कोळीवाडा, दिवा कोळीवाडा, अशा अनेक ठिकाणी उघडी गटारे असल्यामुळे या गटारातील दूषित सांडपाणी पावसाळ्यात अनेकदा नागरिकांच्या घरात शिरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
स्वच्छतेच्या बाबतीत देशात तिसरा क्रमांक पटकावलेल्या या महापालिकेच्या संबंधित अधिका-यांनी प्रत्यक्षात या नगराची पाहणी केल्यास स्वच्छता विभागाचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, असे येथील नागरिकांनी सांगितले.
ऐरोली आणि घणसोली परिसरातील उघड्या गटारांवर नवीन झाकणे बसविण्यात येतील. तसेच गटारातून विद्युतकेबल गेल्याचे निदर्शनास आल्यास यासंदर्भात महावितरणच्या संबंधित अधिका-यांना सूचित करण्यात येईल.
- अमरीश पटनिगीरे, उपायुक्त, परिमंडळ-२, महापालिका