मधुकर ठाकूर
उरण :
मुंबई ,ठाणे, नवी मुंबई येथील असंख्य तरुणाई, आबालवृद्धांचे मौजमजा करण्यासाठी पिकनिक स्पॉट ठरलेल्या उरणच्या येथील पीरवाडी बीचवर थर्टी फर्स्टसाठी तरुणाईनी शुक्रवारपासूनच गर्दी केली आहे.
उरणच्या पिरवाडी समुद्रकिनारा हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत आला आहे. किनाऱ्यावर अथांग पसरलेली रुपेरी वाळू आणि या रुपेरी वाळूत पायी चालण्याची मजा काही औरच असते.निसर्गरम्य वातावरण , चौफेर अथांग पसरलेला समुद्र, समुद्राच्या फेसाळलेल्या लाटा आणि लाटातुन उडणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर झेलून ओलेचिंब होण्याची एक औरच मजा असते. समुद्र किनाऱ्यावरील लांबचलांब नजरेत पडणारी नारळी, पोफळी आणि सुरुची झाडे या नयनरम्य वातावरणामुळे "पीरवाडी" पर्यटन बीच म्हणूनही नावारूपाला आले आहे.मुंबई पासून अगदी जवळच असल्याने दरवर्षी पीरवाडी बीचवर येणार्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल आणि इतर भागातुन येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते.
येथील समुद्र किनाऱ्यावर असलेल्या दर्ग्यावर मुस्लिम समाजातील नव्हे तर हिंदू धर्मातील भाविकांची नेहमीच गर्दी असते.सरंक्षक भिंतीमुळे तर येथील पर्यटन आणखीनच बहरले आहे.समुद्र सफरीचा आनंद लुटण्यासाठी मोटर स्पीडबोटीची व्यवस्था आहे.त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई व परिसरातील शेकडो हौशी पर्यटक या ठिकाणी सणासुदीच्या आणि सुट्टीच्या काळात येत आहेत.पर्यटनाचा आनंद घेतात. पीरवाडी बीचवर नाताळाच्या प्रारंभापासूनच पर्यटकांची वर्दळ वाढली आहे.त्यातच आता थर्टी फर्स्टसाठीही शुक्रवारपासूनच गर्दी वाढत चालली आहे.यामध्ये तरुणाईचा सर्वाधिक भरणा आहे.
मुंबईहून दर्गा तसेच थर्टी फर्स्टसाठी आलेल्या नवोदित कपलने मागील तीन चार वर्षांपासून नेहमीच थर्टी फर्स्टचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी येतो.हे ठिकाण आमच्यासाठी फेव्हरिट असल्याचे हमीद- रुबीना या कपलने सांगितले.तर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या पीरवाडी बीचवर थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी एक दिवस अगोदरच येत असल्याचे अनेक हौशी पर्यटकांनी सांगितले.