थर्टीफस्ट भोवला : पोलिसांनी उतरवली २३६ चालकांची झिंग
By सूर्यकांत वाघमारे | Published: January 1, 2024 07:12 PM2024-01-01T19:12:30+5:302024-01-01T19:12:39+5:30
मद्यपान करून वाहन चालविल्याने कारवाई
नवी मुंबई : मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या २३६ चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. थर्टी फर्स्टच्या अनुशंघाने वाहतूक पोलिसांच्या १६ शाखांमार्फत ठिकठिकाणी नाकाबंदीत या कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करताना मद्यपान करून वाहन चालवणे या चालकांना चांगलेच महागात पडले आहे.
मद्यपान करून वाहन चालविल्याने अपघाताचा अधिक धोका असतो. यामुळे थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते. मद्यपान करून वाहने चालवली जाऊ नयेत असे आवाहनही केले जाते. त्यानंतरही धुंदीत नववर्षात पाऊल टाकत नियम मोडणाऱ्यांवर कारवाईसाठी वाहतूक पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता.
तर वाहतूक शाखा उपायुक्त तिरुपती काकडे यांच्याकडून देखील ठिकठिकाणी भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला जात होता. यामध्ये अवघ्या थर्टी फर्स्टच्या रात्रीत २३६ वाहन चालकांवर ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई करण्यात आली आहे. मद्यपान करून वाहन चालवताना ते पोलिसांना आढळून आले आहेत. त्यामुळे या वाहन चालकांच्या नववर्षाची सुरवात हि पोलिसांच्या कारवाईने झाली आहे.