कळंबोली : रोटरी क्लब आॅफ पनवेल आयोजित पनवेल फेस्टिव्हलमध्ये रविवारी सायंकाळी सी.एक्स एंटरटेनमेंट आणि जॅप्स स्क्रू आयोजित हॅन्डओव्हर फॅशन शोचे शानदार प्रदर्शन झाले. या वेळी डोंबिवली फास्ट चित्रपटातील अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी हजेरी लावली होती. खांदेश्वर रेल्वे स्थानक रोडलगत साडेसहा एक्करवर सर्कस मैदानात दहा दिवस हा फेस्टिव्हल रंगत आहे. या फेस्टिव्हलमध्ये अडीचशे स्टॉल आहेत. लहान मुलांकरिता खेळण्याबरोबरच हायस्पीड ट्रेनचा शोचे प्रदर्शन दाखविण्यात येत आहे. लोकमत या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक आहे.नवी मुंबई, पनवेल, उरण, रायगड येथील तीन दिवसांत तीस हजार लोकांनी पनवेल फेस्टिव्हला भेट दिली आहे. दररोजच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे मनोरंजन होते. आपल्या लाडक्या स्टारसोबत भेटही अनुभवायला मिळते. रविवारी सी.एक्स. एंटरटेनमेंट आणि जॅप्स स्क्रू आयोजित हॅन्डओव्हर फॅशन शोमध्ये चाळीस मॉडेल्स सहभागी झाले होते. रॅम्प वॉकसोबतच दीपक अॅकॅडमी पनवेल, क्रिएटिव्ह मुव या ग्रुपने हिंदी गाण्यावर नृत्य सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळवली. या वेळी मराठी अभिनेता संदीप कुलकर्णी, लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, रोटरी क्लबचे चेअरमन संतोष अंबावने, सचिव निखिल मनोहर, रोटरीयन डॉ. दीपक पुरोहित, मिलिंद पर्वते, सूर्यकांत कुल्हे, रमेश भोळे यांच्यासह रोटरीयन्स, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दोन तासांच्या कार्यक्रमाचे आयोजन सी.एक्स. एंटरटेनमेंटचे रामपाल यादव व जॅप्स स्क्रूचे वैभव कांबळे, गौरव सिंग, विवेक कदम, किरण कातोरे यांनी केले. फेस्टिव्हलचे संयोजन टटल्स एंटरटेनमेंट अॅण्ड मीडियाचे उदय पानसरे, कल्याणी पाठारे यांनी केले आहे. तर फेस्टिव्हलमध्ये रोटरी क्लबने स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिले आहे. औरंगाबाद, इंदोर, बंगलोर, दूरवरची मंडळीही आपल्या कलाकुसरच्या वस्तू, सजावटीच्या वस्तू, कपडे घेऊन आले आहेत.>आगरी जेवणाचे आकर्षणपनवेल फेस्टिव्हलमध्ये खाऊ गल्ली ही खवय्यांसाठी खास मेजवानी ठरत आहे. खाद्य पदार्थाचे दीडशे स्टॉल लावण्यात आले आहेत. आगरी जेवणासोबतच कोल्हापुरी, मालवणी तडका, अस्सल मराठमोळी जेवण, चायनिज पदार्थ, भेळ, पाणीपुरी असे पन्नास वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. पण आगरी जेवण फ़ेस्टिव्हलमध्ये येणाºया लोकांच्या पसंतीस ठरत असल्याचे वेसावा कोळी सी फूड या स्टॉलधारकाने सांगितले.
पनवेल फेस्टिव्हलला तीस हजार रसिकांनी दिली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 2:46 AM