गर्दुल्ल्यांचा अड्डा उद्ध्वस्त, गांजा, एलएसडीसह ३० जण सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 02:35 AM2018-06-20T02:35:46+5:302018-06-20T02:35:46+5:30
सीबीडीच्या डोंगररांगामध्ये अमली पदार्थ ओढणाऱ्यांच्या अड्ड्यांचे दक्ष तरुणांनी स्टिंग आॅपरेशन केले.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : सीबीडीच्या डोंगररांगामध्ये अमली पदार्थ ओढणाऱ्यांच्या अड्ड्यांचे दक्ष तरुणांनी स्टिंग आॅपरेशन केले. दिवसभरामध्ये सहा ग्रुपमधील जवळपास ३० जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गांजा, एलएसडीसह इतर अमली पदार्थांचा साठा सापडला असून, त्यांना ताकीद देऊन सोडण्यात आले आहे. महापालिका, सिडको, वनविभाग व पोलीस जबाबदारी झटकत असल्यामुळे तरुणांनी धाडस करून अमली पदार्थांच्या अड्ड्यांचा पर्दाफाश केला आहे.
नवी मुंबईमधील पर्यटनस्थळांमध्ये सीबीडी सेक्टर ८ मधील तलाव परिसराचाही समावेश आहे; परंतु शासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे हा परिसर तळीरामांचा व अमली पदार्थ ओढणाºयांचा अड्डा बनत चालला आहे. मंगळवारी सकाळी योगेश चव्हाण व त्यांच्या सहकाºयांनी अमली पदार्थ ओढणाºयांचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास १२वी मध्ये शिक्षण घेणाºया चेंबूरमधील १५ विद्यार्थी डोंगरावर जात असल्याचे आढळले. त्यांना थांबवून झडती घेतली असता त्यांच्याकडे गांजा, सिगारेट व एलएसडी पेपर आढळून आले. चेंबूरमध्ये १२० रुपयांना गांजाची पुडी भेटत असून, एलएसडी पेपर ८०० रुपयांना विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले. दुपारी २.३०नंतर पाच ग्रुपना ताब्यात घेतले. यामधील काही तरुण सीवूड परिसरामधील रहिवासी असून महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत. महामार्गानजीक असलेल्या टाटानगर झोपडपट्टीमध्ये १०० रुपयांना गांजाची पुडी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. काही तरुण सीबीडीमध्येच राहणारे असून त्यांनीही महामार्गाजवळच गांजा मिळत असल्याचे सांगितले. चित्ताकँप चेंबूरमधूनही काही तरुण गांजा व इतर अमली पदार्थ ओढण्यासाठी सीबीडीमध्ये आले होते. या सर्व तरुणांना सूचना देऊन सोडून देण्यात आले आहे. पुन्हा या परिसरामध्ये गांजा किंवा इतर अमली पदार्थ ओढताना आढळल्यास पोलिसांच्या हवाली करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अमली पदार्थ ओढणाºयांचे स्टिंग आॅपरेशन करणाºया टीममधील योगेश चव्हाण यांनी सांगितले की परिसरातील तरुणांनी सीबीडी तलाव परिसरात साफसफाई मोहीम राबविली. दोन रविवारी केलेल्या साफसफाईमध्ये २५ गोणींपेक्षा जास्त दारूच्या बॉटल सापडल्या आहेत. यामुळे दक्ष तरुणांनी या परिसरामध्ये मद्यपान करण्यास मनाई असल्याचे फलक लावले; परंतु मद्यपींनी ते फलक काढून टाकले. यामुळे तरुणांनी महापालिकेच्या विभाग अधिकाºयांची भेट घेतली. त्यांनी मनपा मुख्यालयात जाण्यास सांगितले. मनपा मुख्यालयातील अधिकाºयांनी ही जबाबदारी सिडको व वनविभागाची असल्याचे सांगितले. सिडकोनेही त्यांची जबाबदारी झटकली.
ठाण्यामध्ये जाऊन वनविभागाच्या अधिकाºयांची भेट घेतल्यानंतर त्यांनीही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्यामुळे तरुणांनी स्वत:च स्टिंग आॅपरेशन करून या
परिसरातील गंभीर प्रकार निदर्शनास आणला आहे.
>कारवाईकडे दुर्लक्ष
नवी मुंबईची वाटचाल ‘उडता पंजाब’च्या दिशेने सुरू आहे. शहरामध्ये अमली पदार्थांची विक्री व सेवन करणाºयांचे प्रमाण वाढू लागले आहे. सीबीडीमध्ये गांजाची विक्री होत असल्याचे स्टिंग आॅपरेशनमध्ये स्पष्ट झाले आहे. तक्रारी करूनही या अड्ड्यांवर कारवाई होत नाही. सीबीडी तलाव परिसरातील गांजा ओढणाºयांवर कारवाई करण्यासही टाळाटाळ केली जात आहे.
>महाविद्यालयीन मुलांचा समावेश
सीबीडीमध्ये स्टिंग आॅपरेशन केलेली बहुतांश मुले महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. चेंबूर, सीबीडी व सीवूड परिसरामधून गांजा व इतर अमली पदार्थ ओढण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. ७० ते १२० रूपयांना कुठून गांजा विकत घेतला त्याची कबुलीही त्यांनी दिली आहे.
>सीबीडी परिसरामध्ये अमली पदार्थांचे सेवन करणारे सहा ग्रुप आढळले. त्यांच्याकडे गांजा, एलएसडी पेपर व इतर अमली पदार्थ आढळून आले. सीबीडी व चेंबूरमधून अमली पदार्थ विकत घेतल्याचेही सांगितले. सर्वांना सूचना देऊन व चित्रीकरण करून पाठवून दिले आहे.
- योगेश चव्हाण,
सामाजिक कार्यकर्ते