विनोद भोईर / पालीजिद्द, चिकाटी, अथक परिश्रम व शिक्षण या गोष्टींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास कोणत्याही क्षेत्रात यश सहज शक्य असते. सुधागड तालुक्यातील पिलोसरी येथील कृष्णा केदारी व त्यांचे सुपुत्र नितीन कृष्णा केदारी यांनी ३० गुंठे जागेत पॉलिहाऊस उभारून दररोज दोन हजार फुले देणारी जरबेरा फुलांची शेती फुलवली आहे. त्यांनी कृषी उद्योगाच्यामार्फत शासन योजनांच्या माध्यमातून फूलशेती यशस्वी के लीआहे. सुधागड-पाली शहरापासून ४ कि.मी. अंतरावर पिलोसरी गाव वसलेले असून शेतकरी कृष्णा केदारी यांना शेती करण्याची आवड असल्यामुळे त्यांनी आतापर्यंत वाल, मूग, चवळी, हरभरा, मटकी अशा अनेक पिकांची लागवड करून चांगले उत्पादन देखील घेतले आहे. अशी शेतीची आवड त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र नितीन केदारी यांना देखील आहे. या वेळी त्यांनी हायटेक शेतीला प्राधान्य दिले आहे. सुरुवातीला ३० गुंठे जागेत तीन महिने पॉलिहाऊस उभारून दररोज दोन हजार फुले देणारी जरबेरा फुलांची लागवड १५ जुलै २०१६ रोजी केली. या फुलांच्या शेतीसाठी लाल माती व खताचे मिश्रण करून त्याची मशागत त्यांनी केली. त्यानंतर लागवड केलेल्या जरबेरा फुलाच्या उत्पन्नास ५ आॅक्टोबर २०१६ रोजी सुरुवात झाली. या जरबेरा फुलाचे आयुष्य चार वर्षे आहे आणि हे फूल पाण्यामध्ये ठेवल्यास सात दिवस कोमेजत नाही. अशा दररोज दोन हजार फुले देणाऱ्या जरबेरा फुलांची त्यांच्या शेतात बागच तयार झाली आहे.
तीस गुंठ्यात फु लवली जेरबेरा शेती
By admin | Published: April 10, 2017 6:05 AM