सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मोबाइल चोरीला आळा घालून त्यांचा गुन्हेगारी कृत्यातला वापर टाळण्यासाठी केंद्र सरकारने स्मार्ट पाऊल उचलली आहे. चोरीला गेलेले मोबाइल ब्लॉक करता यावेत, त्यांचा वापर टाळावा, यासाठी सीईआयआर पोर्टल (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंडिटी रजिस्टर) तयार केले आहे. त्या माध्यमातून मोबाइल ट्रॅक करून संबंधितांना ते परत करण्यात हे पोर्टल अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
आवड, सुविधा किंवा स्टेट्स सिम्बॉलमुळे अनेकांच्या हातात ५० हजार ते लाखोंच्या घरातले स्मार्टफोन पाहायला मिळतात. व्हायरल व्हिडिओतला मुंबईचा भिकारी व भंगारवाला यांच्या हातातले लाखोंचे मोबाइलही त्याचाच भाग. मात्र, महागडे मोबाइल घेण्यापेक्षा सांभाळणे अधिक कठीण बनत चालले आहे. घरातून, रेल्वे अथवा बस प्रवासात, गर्दीच्या ठिकाणी किंवा रस्त्याने फोनवर बोलत चालतानाही हातातून मोबाइल हिसकावले जात आहेत. परंतु, एकदा चोरीला गेलेला फोन परत मिळत नाही, असा पूर्वीपासूनचा समज आहे. तो खोडून काढण्याचा प्रयत्न सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून होत आहे.
आजवर चोरीला गेलेला मोबाइल शोधण्यासाठी पोलिसांना टेलिकॉम कंपन्यांच्या सातत्याने संपर्कात राहावे लागत होते. या वेळखाऊ प्रक्रियेत व रोजच्या कामात मोबाइलचा तपास मागे पडून चोरीला गेलेला, हरवलेला मोबाइल परत मिळेल, याची खात्री नसायची. सीईआयआर पोर्टलमुळे चोरीच्या मोबाइलवर तांत्रिक नजर ठेवून तो पुन्हा वापरात येताच त्याची माहिती पोलिसांना कळवली जाते. त्यानंतर संबंधित ठिकाणावरून फोन ताब्यात घेण्याचे काम पोलिसांना करावे लागत आहे.
दुबईत विकला फोनकोपरखैरणेतून चोरीला गेलेला फोन सहा महिन्यांनी दुबईत विकला गेल्याचा प्रकार पोर्टलमुळे समोर आला. त्यानंतर पोलिसांनी दिल्लीतून हा फोन ताब्यात घेऊन संबंधिताला परत केला.
हत्येचा गुन्हा उघडपनवेलमध्ये हत्येच्या गुन्ह्यात महिलेचा मोबाइल पोलिसांनी ट्रॅकिंगवर टाकला होता. तीन महिन्यांनी तो राज्याबाहेर वापरात येताच पोलिस फोनद्वारे पोलिस मारेकऱ्यापर्यंत पोहचले होते.