- कमलाकर कांबळेनवी मुंबई - शहरातील ३७८ इमारती महापालिकेने धोकादायक घोषित केल्या आहेत. विशेष म्हणजे डागडुजी करून वापरास अनुकूल असल्याचा तीन महिन्यांपूर्वी निर्वाळा देणाऱ्या महापालिकेने कोपरीतील सिडकोच्या बैठ्या इमारतींचा या यादीत समावेश केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या भूमिकेविषयी रहिवाशांत संभ्रम निर्माण झाला आहे.पावसाळ्याच्या अगोदर सालाबादप्रमाणे महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींची यादी घोषित केली आहे. या यादीत कोपरी सेक्टर २६ येथील आठ रहिवासी सोसायट्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी महापालिकेच्या आवाहनानुसार येथील सोसायट्यांनी आपल्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेतले आहे. या अहवालाच्या आधारे महापालिकेने या सोसायटीतील इमारती किरकोळ दुरुस्ती प्रवर्गात (शासन परिपत्रक, सी-३) मोडणाºया असल्याचे स्पष्ट केले होते. ३0 मार्च २0१७ रोजी येथील चिंतामण को-आॅप. हाउसिंग सोसायटीला यासंदर्भात पत्र देवून तातडीने किरकोळ दुरुस्ती करून त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या होत्या. अशा प्रकारचे पत्र या विभागातील सर्व सोसायट्यांना दिले होते. त्यानुसार संबंधित सोसायट्यांनी आवश्यकतेनुसार किरकोळ दुरुस्तीची कामे हाती घेतली. परंतु त्यानंतर लगेच म्हणजे अवघ्या तीन महिन्यांत म्हणजेच २८ जुलै २0१७ रोजी महापालिकेने येथील सर्व इमारतींचा धोकादायक यादीत समावेश केला. यावर्षी तर या इमारतींचा अतिधोकादायक यादीत समावेश करण्यात आला आहे. तशा आशयाचे फलक सोसायटीच्या आवारात लावण्यात आले असून रहिवाशांनी तातडीने या इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांत कमालीचा असंतोष पसरला आहे.महापालिकेच्या भूमिकेवर संशय३0 मार्च २0१७ रोजीच्या नोटीसद्वारे महापालिकेने या इमारती किरकोळ दुरुस्ती प्रवर्गात मोडणाºया असल्याचे स्पष्ट केले होते. ही नोटीस अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त कार्यालयाकडून बजावण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यानंतर म्हणजेच २८ जुलै २0१७ रोजी महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयाने पुन्हा नोटीस बजावून या इमारती धोकादायक असून त्या त्वरित रिकाम्या करण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे कोपरी सेक्टर २६ हा परिसर महापालिकेच्या तुर्भे विभागात (वॉर्ड डी) मोडतो. असे असताना वाशी विभाग (वॉर्ड सी) कार्यालयाकडून नोटीस कोणत्या आधारे बजावण्यात आली, असा सवाल चिंतामण को-आॅप. हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष संजय कोचरेकर आणि सेक्रेटरी एस.ए. सोडनवार यांनी उपस्थित केला आहे.महापालिकाआयुक्तांना निवेदनसात दिवसांच्या आत या इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना महापालिकेने येथील रहिवाशांना दिल्या आहेत. त्यानंतर विद्युत व पाणीपुरवठा खंडित केला जाईल, असे बजावण्यात आले आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या येथील रहिवाशांनी स्थायी समितीच्या माजी सभापती शुभांगी पाटील यांच्यासमवेत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेवून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी रहिवाशांना दिले आहे. असे असले तरी शुभांगी पाटील यांनी महापालिकेच्या गलथान कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे.रहिवासी हवालदिल : कोपरी सेक्टर २६ येथे सिडकोने बांधलेल्या बी टाईपच्या एक आणि दोन मजल्याच्या २२५ इमारती आहेत. या इमारती आठ हाउसिंग सोसायट्यात विभाजित करण्यात आल्या आहेत. येथे एकूण ९६0 कुटुंबे राहत आहेत. ही सर्व कुटुंबे अल्प व मध्यम आर्थिक गटातील आहेत. त्यामुळे इमारती रिकाम्या करण्याचे फलक सोसायटीच्या समोर लागल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत.पुनर्बांधणीसाठीच धोकादायक यादीत?शहरात सध्या जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचे वारे वाहू लागले आहे. सिडकोने कोपरी सेक्टर २६ येथे बांधलेल्या इमारती चाळीस वर्षे जुन्या आहेत. शहरातील अन्य इमारतींच्या तुलनेत या इमारतींची स्थिती ठीक आहे. असे असले तरी महापालिकेतील काही अधिकाºयांना हाताशी धरून काही घटकांकडून या इमारती जाणीवपूर्वक धोकादायक असल्याचा आभास निर्माण केला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
तीन महिन्यांत ‘त्या’ इमारती बनल्या धोकादायक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 4:23 AM