‘त्या’ स्थलांतरित गावांतील मतदारांत मतदान केंद्रावरून संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 11:42 PM2019-04-07T23:42:40+5:302019-04-07T23:43:08+5:30
स्थलांतर झालेल्या ग्रामस्थांकडून मतदानाविषयी जनजागृती केली जात आहे. अधिकाधिक लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.
नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारांचा प्रचार रंगात आला आहे. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने प्रमुख उमेदवारांची कसरत सुरू आहे; परंतु मावळ मतदार संघातील विमानतळ प्रकल्पामुळे स्थलांतरित झालेल्या त्या दहा गावांतील ग्रामस्थांत मतदान केंद्रावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडूनही आतापर्यंत स्पष्ट सूचना न आल्याने सुमारे २० हजार मतदारांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकसभेच्या मावळ मतदार संघात शेवटच्या टप्प्यात म्हणजेच २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या मतदार संघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यात खरी लढत होणार आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी मतदार संघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. दहा गावे स्थलांतरित झाल्याने येथील पारंपरिक मतदारांचा शोध घेण्याचे प्रयास दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून केले जात आहेत. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पामुळे बाधित झालेल्या दहा गावांचे करंजाडे, वडघर, उलवे आणि प्रस्तावित पुष्पकनगरमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. दहा गावांतील जवळपास ३००० कुटुंबे यामुळे विस्थापित झाली आहेत. पूर्वी गावातच मतदान केंद्र असायचे, त्यामुळे मतदानासाठी फार दूर जायची गरज नसायची. मात्र, या वेळी अख्खी गावेच स्थलांतर झाली आहेत. सिडकोने या गावांसाठी उलवे आणि करजांडे येथे दोन शाळा बांधल्या आहेत. या शाळांत मतदान केंद्र असेल, असे आडाखे ग्रामस्थांकडून बांधले जात आहेत; परंतु याबाबत अद्यापि कोणतीही स्पष्टता नसल्याने ग्रामस्थांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या स्थलांतरित मतदारांसाठी अद्यापि मतदान केंद्रप्रमुखांचीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे नक्की मतदान कुठे करायचे, असा प्रश्न येथील २० हजार मतदारांना पडला आहे.
स्थलांतर झालेल्या ग्रामस्थांकडून मतदानाविषयी जनजागृती केली जात आहे. अधिकाधिक लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. विशेष म्हणजे, या गावांतील काही कुटुंबांच्या स्थलांतराची प्रक्रिया आजही सुरू आहे. मतदारयादीत मतदारांचा जुनाच पत्ता असणार आहे. त्यामुळे नवीन पत्त्यावरील मतदारांना त्यांचा मतदान क्रमांक देण्याबाबतही अद्यापि कोणतीही कार्यवाही सुरू असल्याचे दिसत नाही. या परिस्थितीमुळे स्थलांतरित गावांतील सुमारे २० हजार मतदारांत मतदान प्रक्रियेवरून गोंधळाचे वातावरण आहे. स्थलांतरित झालेल्या दहा गावांत आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या शेकापचा प्रभाव आहे. त्याचप्रमाणे मागील काही वर्षात या गावात भाजपनेसुद्धा आपली पाळेमुळे रोवली आहेत. त्यामुळे मतदान केंद्रावरून निर्माण झालेल्या गोंधळाचा फटका राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यासह सेनेचे श्रीरंग बारणे यांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.