‘त्या’ दहा गावांमध्ये शेवटचा गणेशोत्सव, विमानतळबाधित गावे होणार स्थलांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 05:33 AM2017-09-03T05:33:06+5:302017-09-03T05:33:21+5:30
विमानतळबाधित ‘त्या’ दहा गावांतील गणेशोत्सव यंदाचा शेवटचा गणेशोत्सव असणार आहे. कारण विमानतळ प्रकल्पासाठी ही गावे पावसाळ्यानंतर स्थलांतरित करण्यात येणार आहेत.
- वैभव गायकर ।
पनवेल : विमानतळबाधित ‘त्या’ दहा गावांतील गणेशोत्सव यंदाचा शेवटचा गणेशोत्सव असणार आहे. कारण विमानतळ प्रकल्पासाठी ही गावे पावसाळ्यानंतर स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे या गावांचे गावपण संपुष्टात येणार आहे. त्याचबरोबर तेथील पारंपरिक गोष्टी, उत्सव यालासुद्धा पूर्णविराम बसणार आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून या गावांत विविध सण एकत्रित साजरे केले जातात. त्यापैकी गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. परंतु पुढच्या वर्षी या गावांत हा उत्सव होणार नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता पनवेलमधील चिंचपाडा, कोपर, कोल्ही, वाघिवली, वरचा ओवळा, वाघिवली वाडा, गणेशपुरी, उलवा, तरघर, कोंबडबुजे या गावांची जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे ही गावे स्थलांतरित केली जाणार आहेत. त्यामुळे या दहा गावांतील प्राचीन संस्कृती लोप पावणार आहे. आम्हाला विकास हवा होता; मात्र तो आमच्या मुळावर उठत असेल तर आम्हाला असा विकास नको, अशी भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वडिलोपार्जित शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या रूढी, परंपरा, संस्कृती अशी एका झटक्यात लोप पावणार असेल तर हा कसला विकास, असा प्रश्न येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
या दहा गावांमध्ये आगरी, कोळी, कराडी समाज मोठ्या प्रमाणात आहे. येथे सर्व सण-उत्सव एकत्र येऊन साजरे केले जातात. यामध्ये दिवाळी, दसरा, चतुर्थी, सप्ताह अशा उत्सवांत गावे एकत्रित येतात. विशेषत: लग्नसमारंभावेळीदेखील हा समाज मोठ्या संख्येने येत असतो. मात्र ही गावे स्थलांतरित झाल्यानंतर सिमेंटच्या जंगलात आम्ही आमचे सण कसे साजरे करायचे? स्थलांतरित होणाºया ठिकाणी आम्हाला आमची परंपरा जपणे शक्य होईल का? आमचे गावपण हरवून त्याला शहरी वस्तीचा साज चढणार आहे. त्यामुळे आमच्या पारंपरिक उत्सवांना अप्रत्यक्षपणे प्रतिबंध लागणार असल्याची खंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित दहा गाव संघर्ष समितीचे नाथा पाटील यांनी व्यक्त केली. तुम्ही गाव का सोडत आहात? आपल्याला पैसे नको आहेत. आपले गावच चांगले आहे. या ठिकाणी झाडे, शेती, आपली घरे असताना आपण दुसरीकडे कशासाठी जायचे, असे प्रश्न आमची मुले व नातवंडे विचारत आहेत. अशावेळी आमच्याकडे त्यांना उत्तर देण्यासाठी काहीच शब्द नसतात.
माणूस आपल्या घरातून काही कारणास्तव बाहेर पडल्यास त्याला आपलं घर पुन्हा कधी गाठतो, असा प्रश्न पडतो. मात्र घर तर सोडाच आपले गावदेखील पुन्हा आपल्याला पाहावयास मिळणार नाही ही कल्पनाच मनाला वेदना देणारी असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. याच मन:स्थितीत येथील ग्रामस्थ यंदा आपला शेवटचा गणेशोत्सव साजरा करीत आहेत. या दहा गावांमध्ये सुमारे ३५00 कुटुंबे राहत आहेत. या ठिकाणची लोकसंख्या २५ ते ३0 हजारांच्या घरात आहे. विशेष म्हणजे इच्छा नसताना गाव सोडून जावे लागणार असल्याने भविष्यातील सण, रूढी, परंपरा पुढची पिढी सांभाळेल का? अशी चिंता गावकरी व्यक्त करीत आहेत. नवीन पिढीला रूढी, परंपरा चालीरीती यांची माहिती नसल्याने एक प्रकारे धर्मसंकटच येथील रहिवाशांवर येऊन ठेपले आहे. गाव सोडावे लागणार असल्याची हळहळ ग्रामस्थांकडून व्यक्त होत असून, सर्व सुरळीत व्हावे, अशी मागणी विघ्नहर्त्याच्या चरणी केली जात आहे.
कोपर गावात ‘एक
गाव एक गणपती’
कोपर गावात मागील शेकडो वर्षांपासून श्री स्वयंभू गणेश चिंतामणी मंदिरात ‘एक गाव, एक गणपती’ हा उत्सव साजरा केला जातो. गावातील ज्येष्ठांच्या माहितीनुसार १५0 वर्षांपेक्षा जास्त जुनी ही परंपरा आजतागायत सुरू आहे. गावात या सणाच्या दिवशी सर्व गाव एकत्र येऊन भजन, कीर्तन, सप्ताह यांसारख्या कार्यक्र मांचे आयोजन केले जाते. मात्र पावसाळ्यानंतर या गावांचे स्थलांतरण सुरू होणार असल्याने यंदाचे गणपती आमचे शेवटचे गणपती असणार ही भावना अतिशय वेदनादायी असणार असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.
उत्सवानंतर स्थलांतरित होणारी गावे
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता चिंचपाडा, कोपर, कोल्ही, वाघिवली, वरचा ओवळा, वाघिवली वाडा, गणेशपुरी, उलवा, तरघर, कोंबडभुजे ही गावे सिडकोने बसविलेल्या पुष्पकनगर येथे स्थलांतरित होणार आहेत. यापैकी कोपर गाव वगळले तर उर्वरित नऊ गावांत घरगुती गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या दहा गावांमध्ये आगरी, कोळी, कराडी समाज मोठ्या प्रमाणात आहे. सर्व सण एकत्र येऊन साजरे करणारा हा समाज आहे. यामध्ये दिवाळी, दसरा, चतुर्थी, सप्ताह अशा सर्वच सणांना एकत्र येऊन गावजेवण करण्याची पद्धत या समाजात आहे. विशेषत: लग्नसमारंभावेळीदेखील हा समाज मोठ्या संख्येने येत असतो. मात्र ही गावे स्थलांतरित झाल्यानंतर सिमेंटच्या जंगलात आम्ही आमचे सण कसे साजरे करणार? त्याच ठिकाणी राहत असलेल्या दुसºया रहिवाशांना आमच्या रूढी-परंपरा, संस्कृतीबद्दल माहिती नसल्याने आमच्या सणांवर निर्बंध येणार आहेत. आमची लहान मुले आम्हाला सांगतात की, बाबा तुम्ही गाव सोडायला का निघालात? आपल्याला पैसे नको आहेत. आपले गावच चांगले आहे. या ठिकाणी झाडे, शेती, आपली घरे असताना आपण दुसरीकडे कशासाठी जायचे? अशावेळी आमच्याकडे त्यांना उत्तर देण्यासाठी काहीच शब्द नसतात .
- नाथा पाटील, अध्यक्ष,
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित दहा गाव संघर्ष समिती