‘त्या’ दहा गावांच्या स्थलांतराला मिळेल गती; सिडकोला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 04:42 AM2018-09-19T04:42:14+5:302018-09-19T04:42:39+5:30
विमानतळ प्रकल्पबाधित ग्रामस्थांचा बैठकीत सकारात्मक प्रतिसाद
नवी मुंबई : गणेशोत्सवानंतर विमानतळबाधित गावांच्या स्थलांतराला गती मिळेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. यासंदर्भात १५ दिवसांपूर्वी ग्रामस्थांबरोबर बैठक झाली. यात ग्रामस्थांनी स्थलांतराला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सिडकोच्या सूत्रांनी सांगितले.
विमानतळबाधित दहा गावांतील सुमारे तीन हजार कुटुंबांचे वडघर, करंजाडे व वरचा ओवळा येथे स्थलांतरण करण्यात येणार आहे. या दहा गावांतील ३००० कुटुंबे पर्यायी जागेवर स्थलांतरित होणार आहेत. स्थलांतरित होणाऱ्या ग्रामस्थांनी सिडकोच्या वतीने भरीव पुनर्वसन पॅकेज देण्यात आले आहेत. त्यानंतरही काही मागण्यांवर ग्रामस्थ ठाम आहेत. त्याचा परिणाम म्हणून स्थलांतरणाच्या प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. स्थलांतरासाठी ७ जुलै अंतिम मुदत देण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत केवळ १७०० ग्रामस्थांनी स्थलांतरण केले आहे. उर्वरित १३०० ग्रामस्थांनी तातडीने स्थलांतरण करून आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या उभारणीत सहकार्य करावे, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. १५ दिवसांपूर्वी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ग्रामस्थांबरोबर पुन्हा बैठक घेऊन गणेशोत्सवानंतर स्थलांतरण करण्याचे आवाहन केले.
दहा गावांपैकी पाच गावांतील ग्रामस्थांकडून स्थलांतराला प्रतिसाद मिळत आहे; परंतु उर्वरित पाच गावांतील ग्रामस्थ काही मागण्यांवर अडून बसले आहेत; परंतु त्यांच्याबरोबर समाधानकारक चर्चा झाली असून, गणेशोत्सवानंतर स्थलांतराच्या प्रक्रियेला वेग मिळेल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला आहे.
पुनर्वसनाच्या ठिकाणी अद्याप पायाभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. शाळा, हॉस्पिटल्स, तसेच पाणी या अत्यावश्यक सुविधांची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वप्रथम या सुविधा द्या, मगच स्थलांतर करू, असा पवित्रा वरचे ओवळा गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे. वरचा ओवळा हे गाव धावपट्टीच्या मुख्य गाभा क्षेत्रात असल्याने सर्वप्रथम या गावाचे स्थलांतर होणे आवश्यक आहे. गणेशोत्सवानंतर येथील ग्रामस्थ नक्कीच स्थलांतर करतील, असा विश्वास सिडकोला वाटत आहे.