‘ त्या’ गावांचे स्थलांतर आता गणेशोत्सवानंतरच; १,७00 कुटुंबांनी मागितली मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 01:30 AM2018-07-31T01:30:20+5:302018-07-31T01:30:28+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित दहा गावांना स्थलांतरासाठी देण्यात आलेली मुदत ७ जुलै रोजी संपुष्टात आली आहे. या मुदतीपर्यंत केवळ १३00 कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित दहा गावांना स्थलांतरासाठी देण्यात आलेली मुदत ७ जुलै रोजी संपुष्टात आली आहे. या मुदतीपर्यंत केवळ १३00 कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. उर्वरित कुटुंबांनी पुनर्वसन पॅकेज धोरणानुसार तातडीने स्थलांतर करावे, असे आवाहन सिडकोच्या माध्यमातून करण्यात आले आहे. असे असले तरी गणेशोत्सवानंतरच स्थलांतर करणाच्या प्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वासही सिडकोच्या सूत्राने व्यक्त केला आहे.
विमानतळबाधित दहा गावातील सुमारे तीन हजार कुटुंबांचे वडघर, करंजाडे व वरचा ओवळा येथे स्थलांतर करण्यात येणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी यासंदर्भात गेल्या महिन्यात ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांच्या शिल्लक मागण्यांवरही सकारात्मक निर्णय घेतले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी दिलेल्या मुदतीत आपली घरे रिकामी करून पुनर्वसन ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन केले होते. मात्र, या आवाहनाला ग्रामस्थांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दहा गावांपैकी पाच गावांतील ग्रामस्थांकडून स्थलांतराला प्रतिसाद मिळत आहे, परंतु उर्वरित पाच गावांतील ग्रामस्थ काही मागण्यांवर अडून बसल्याने या प्रक्रियेला खीळ बसल्याचे दिसून आले आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे विकासकाकडे अलीकडेच हस्तांतरण करण्यात आले आहे. त्यानुसार जीव्हीके इंटरनॅशनल कंपनीने विमानतळाच्या विकासकामाला गती दिली आहे. डिसेंबर २0१९ मध्ये विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट विकासक कंपनीसमोर आहे, परंतु विमानतळाच्या गाभा क्षेत्रात असलेल्या दहा गावांच्या स्थलांतराला अपेक्षित गती मिळत नसल्याने सिडकोसह जीव्हीकेसमोर पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याशी संपर्क साधण्यचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
- पुनर्वसनाच्या ठिकाणी अद्याप पायाभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. शाळा, हॉस्पिटल्स, तसेच पाणी या अत्यावश्यक सुविधांची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वप्रथम या सुविधा द्या, मगच स्थलांतर करू, असा पवित्रा वरचे ओवळा गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे. वरचा ओवळा हे गाव धावपट्टीच्या मुख्य गाभा क्षेत्रात असल्याने सर्वप्रथम या गावाचे स्थलांतर होणे आवश्यक आहे. असे असले, तरी सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यानंतर, लगेच गणेशोत्सव येत आहे. गणेशोत्सवानंतर येथील ग्रामस्थ नक्कीच स्थलांतर करतील, असा विश्वास सिडकोला वाटत आहे.