जेजुरकरवर हल्ला करणारे अटकेत; कोपर खैरणेतली घटना
By सूर्यकांत वाघमारे | Published: September 17, 2022 04:50 PM2022-09-17T16:50:46+5:302022-09-17T16:51:18+5:30
तलवारीसह चॉपरने केले होते वार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कोपर खैरणे येथे घडलेल्या हल्या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून सर्वजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांनी तलवारी व चॉपरने राजेश जेजुरकर याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. वेळीच मिळालेल्या उपचारामुळे तो बचावला असून याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
कोपर खैरणे सेक्टर ३ येथील उद्यानात सोमवारी रात्री हा प्रकार घडला होता. त्यामध्ये राजेश जेजुरकर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजेश याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच परिसरातील इतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांसोबत त्याचा वाद झाला होता. यातून रॉकी सिंग याच्या मदतीने त्याच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. त्यानुसार राजेश हा सोमवारी दुपारी मद्यपान करून उद्यानात झोपला असता रॉकी व त्याच्या पाच साथीदारांनी तलवारी व चॉपरने त्याच्यावर वार केले होते. हा प्रकार उघड झाल्यानंतर जखमी राजेशला पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने निकिटवर्तीयांच्या मदतीने त्याला फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आले. त्यामुळे वेळीच मिळालेल्या उपचारामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हल्लेखोरांच्या अटकेसाठी कोपर खैरणे पोलिसांची पथके तयार करण्यात आली होती. त्यांनी डोंबिवली परिसरातून रॉकी सिंग याला अटक केल्यानंतर त्याचे साथीदार गजानन खिल्लारे व हर्षद भोसले यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या तलवारी व चॉपर जप्त करण्यात आले आहेत. तर इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
जखमी व हल्लेखोर एकाच परिसरातले असून गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत. राजेश व रॉकी दोघेही परिसरात दबदबा निर्माण करू पाहत होते. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान पोलिसांनी रॉकी सिंग याला अटक केल्यानंतर त्याने जीव घेण्याच्या उद्देशाने जेजुरकर याच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली. मात्र त्यात तो वाचल्याची खंत देखील तो उघडपणे व्यक्त करत होता. यावरून तरुणांमधल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे उघड दर्शन घडत आहे. तर न्यायव्यवस्थेने पोलिसांचे बांधलेले हात व कायद्यातल्या पळवाटा अशा गुन्हेगारांचे मनोबल वाढवत असल्याची खंत सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.