नवी मुंबई : मुलावर जादूटोणा करण्याची भीती दाखवून व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या एकाला सीबीडी पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेला हा तरुण त्याच व्यावसायिकाचा कामगार आहे. अनोळखी नंबरवरून फोन व मेसेज करून तो व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावत होता.शिलोम औताडे (१८) असे अटक केलेल्या खंडणीखोर तरुणाचे नाव आहे. तो खारघरचा रहिवासी असून मूळचा अहमदनगर जिल्ह्णातील आपेगावचा आहे. सीबीडीचे व्यावसायिक दीपक बेद यांच्या तीन वर्षांच्या मुलाच्या जीविताची भीती दाखवून तो खंडणी मागत होता. तो बेद यांच्याकडे हाऊसकीपिंगचे काम करत असे. जास्त परिचय नसल्याचा गैरफायदा घेऊन सहा दिवसांपासून फोनवर मेसेज व कॉल करून खंडणीसाठी धमकावत होता. जादूटोणा करण्याची धमकी देत होता.त्यानुसार उपआयुक्त शहाजी उमाप, सहाय्यक आयुक्त धनराज दायमा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मीरा बनसोडे यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली होती. बेद यांना ज्या क्रमांकावरून मेसेज येत असे, ते सिमकार्ड मुलीच्या नावावर नोंद असून हरवल्याचे स्पष्ट झाले. शोध घेतला असता बेद यांच्या चालकाचे नाव समोर आले. त्याच्या चौकशीत तो नंबर आपला भाचा व बेद यांचेच हाऊसकीपिंगचे काम करणारा शिमोल याचा असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी चौकशीत शिलोम याने गुन्ह्याची कबुली देताच त्याला अटक केल्याचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.त्याने बेद यांना पैसे घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले होते. परंतु पोलीस आणल्याच्या संशयावरून तो खंडणीची रक्कम घेण्यासाठी येत नव्हता. अखेर मोबाइल सिमकार्डच्या माहितीद्वारे त्याचा शोध घेऊन अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)
जादूटोण्याची धमकी देणाऱ्यास अटक
By admin | Published: August 19, 2015 2:23 AM