मधुकर ठाकूर
उरण : केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जेएनपीए अंतर्गत असलेल्या आरकेएफ संस्थेच्या मुख्य प्रशासक अधिकारी पुजा अंजनीकर यांनी प्रेमा संदर्भात आपले विचार आणि बियरच्या जाहिरातीचे पोस्टर्स इंन्साग्रॅमवर रील बनवून टाकल्याने पालक-शिक्षकवर्गात संतापाची लाट उसळली आहे. शिक्षक, पालकांना नेहमीच हिनतेची वागणूक देणाऱ्या आणि पवित्र अशा शैक्षणिक क्षेत्रात काळीमा फासण्याचा प्रयत्न करणाऱ्या या प्रशासक अधिकाऱ्यांनाच निलंबित करण्याच्या आणि संस्थाच हटविण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (४)१००-१२५ शिक्षक, पालकांनी कोसळणाऱ्या भर पावसातच शाळेच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन केले.
जेएनपीएच्या कामगार वसाहतीत केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जेएनपीएची १ ते १० पर्यंत शाळा आहे.जेएनपीएनची ही शाळा आरकेएफ संस्थेला अनुदान तत्वावर चालविण्यासाठी देण्यात आली आहे.या शाळेत २५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.जेएनपीए शाळेसाठी अनुदानापोटी वर्षाकाठी दोन कोटी देते.तर राज्य शासनानेही यावर्षी पासुन शाळेसाठी १ कोटी २० लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानातून चालविण्यात येत असलेल्या या शाळेच्या व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरोधात शिक्षक-पालकांमध्ये याआधीच संघर्ष सुरू आहे. विद्यार्थ्यांची फी, गैरसोयी, शिक्षकांचे थकित वेतन आदी विविध प्रश्नांवर आंदोलन, संघर्ष सुरू असतानाच शाळेच्या मुख्य प्रशासक अधिकारी पुजा अंजनीकर यांनी प्रेम आणि बियरच्या जाहिरातीचे पोस्टर्स रील बनवून इंन्साग्रॅमवर टाकल्याची बाब समोर आली आहे. शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासण्याचा प्रयत्न करणाऱ्या या संतापजनक प्रकारामुळे पालक -शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संतप्त झालेल्या शिक्षक-पालकांनी पुजा अंजनीकर यांना तत्काळ निलंबित करणे, गैरसोयी दूर करणे, आणि संस्थाच हटविण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (४)१००-१२५ शिक्षक, पालकांनी कोसळणाऱ्या भर पावसातच शाळेच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन केले.
या आंदोलनाप्रसंगी माजी आमदार जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, जेएनपीए कामगार ट्र्स्टी तथा माजी जिल्हा प्रमुख दिनेश पाटील,पालक संघटनेचे अध्यक्ष किरण पाटील, किरीट पाटील, रमाकांत पाटील, शिक्षक संघटनेचे नरसु पाटील आणि इतर राजकीय पक्षांच्या मान्यवरांसह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थीही उपस्थित होते.
यानंतर माजी आमदार जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, जेएनपीए कामगार ट्र्स्टी तथा माजी जिल्हा प्रमुख दिनेश पाटील,पालक संघटनेचे अध्यक्ष किरण पाटील, किरीट पाटील, रमाकांत पाटील, शिक्षक संघटनेचे नरसु पाटील आणि इतर राजकीय पक्षांच्या मान्यवरांसह शिक्षक, शिक्षिक आदींच्या शिष्टमंडळाने मुख्य प्रशासक रविंद्र इंदुलकर यांची भेट घेऊन चर्चा केली.या चर्चेत पुजा अंजनीकर यांना तत्काळ निलंबित करणे, शाळेतील गैरसोयी दूर करणे, दुसऱ्या इमारतीत हलविण्यात आलेले ५ वी ते १० च्या विद्यार्थ्यांचे वर्ग मुळ इमारतीत हलविणे,चार महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन आठ दिवसांत अदा करणे आदी मागण्या चर्चेअंती मान्य करण्याचे आश्वासन प्रशासन अधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती शिक्षक संघटनेचे नरसु पाटील यांनी दिली.
खासगी आयुष्यात शाळेच्या आवाराबाहेर पुजा अंजनीकर यांनी काय केले याबाबत बोलणे उचित ठरणार नाही.विद्यार्थी-पालक यांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण केले जाईल, त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.आजच्या आंदोलनात निम्म्याहून अधिक शिक्षक कामावर हजर आहेत. - रविंद्र इंदुलकर,मुख्य प्रशासक, आरकेएफ.