पनवेल : खांदा वसाहतीतील सीकेटी महाविद्यालयात रविवारी आयोजित महाआरोग्य शिबिरात जवळपास आठ हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला. सकाळपासून कोसळणाऱ्या धुवाधार पावसाने शिबिराला प्रतिसाद मिळेल की नाही, याबाबत शक्यता निमाण झाली होती. मात्र, शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध आरोग्य सुविधांचा लाभ घेतला.सिडको अध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले होते. शनिवारी रात्रीपासून पनवेल तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक भागांत पुराचे पाणी आले होते. त्यामुळे रस्ते बंद झाले होते. काहींच्या घरात पाणी शिरल्याने शिबिराला गर्दी होईल की नाही याबाबत शंका होती, पण सकाळी ८ वाजल्यापासूनच लोकांनी गर्दी सुरू झाली. दुपारी २ वाजेपर्यंत वेळ असताना, त्यानंतरही लोक तपासणीसाठी येत होते. नेत्र तपासणीसाठी मोठी गर्दी होती. दोन मजल्यांवर फक्त नेत्रतपासणीसाठी सोय आणि ताबडतोब चश्मे दिले जात होते.याशिवाय महिला आणि पुरुषांसाठी जनरल तपासणी, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि हाडांची तपासणी सीकेटी महाविद्यालयात तर दंतरोग, मधुमेह, नाक, कान, घसा, बालरोग, त्वचा आणि हृदयरोग तपासणी सीकेटी लॉ कॉलेजमध्ये करण्यात आली. यावेळी जे. जे. रुग्णालयातील ४५ डॉक्टर आले होते. याशिवाय नवी मुंबईसह पनवेलमधील डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. शिबिरात एकूण ८,५०० रुग्णाची तपासणी करण्यात आल्याची माहिती डॉक्टर अरुणकुमार भगत यांनी दिली.
आरोग्य शिबिरात हजारो नागरिकांचा सहभाग; नेत्र तपासणीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 12:56 AM