अरुणकुमार मेहत्रे, कळंबोलीस्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखवून येथील एका बिल्डरने कोट्यवधींची कमाई केली. मात्र गेल्या तीन वर्षांत तीन हजार ग्राहकांपैकी एकालाही घर दिले नसल्याने ग्राहक पैशाकरिता हेलपाटे मारीत आहेत. बिल्डरने बुकिंग कार्यालयासह मोबाइलही बंद केल्याने हवालदिल झालेल्या ग्राहकांनी अखेर रविवारी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्र ार दिली. पोलिसांनी बिल्डर आशिष मोजरला बोलावून तंबी दिल्यावर त्याने ठराविक वेळात ग्राहकांचे पैसे देण्याचे आश्वासन दिले.विहिघर, नेरेपाडा, हरिग्राम, चिपळे या ठिकाणी एकूण सात गृहनिर्माण प्रकल्प स्वप्नपूर्तीच्या नावाने उभारीत असल्याची जाहिरात आशिष, शरद आणि बाळकृष्ण या मोजर बंधूंनी दिली होती. २0१२ सालापासून ते स्वप्नपूर्तीच्या नावावर बुकिंग करीत होते. पनवेल रेल्वेस्थानकाबाहेर कार्यालय थाटून बिल्डर बुकिंग करून घेत होते. तीन ते दहा लाखांपर्यंतची रक्कम त्यांनी जवळपास तीन हजार जणांकडून घेतली आहे. त्यांना पावत्या देवून वन आर के, वन बीएचके घरे देण्याचे आश्वासन दिले. मात्र आता नैनाच्या नावावर वेळकाढू धोरण अवलंबत फाईल मंजुरीकरिता गेली आहे, ती पास झाली की कामाला सुरुवात करू, असे आश्वासन बिल्डरकडून दिले जायचे. मात्र गेल्या तीन वर्षांत एकाही ग्राहकाला घर मिळाले नाही. उलट कार्यालयाबरोबर सगळा गाशा स्वप्नपूर्ती बिल्डरने गुंडाळला. घरे कधी देणार किंवा पैसे परत देणार की नाही, याबाबत कोणीही काही सांगत नाही. आता आॅफिसही बंद करण्यात आल्याचे सुनिता तांबोळी या ग्राहक महिलेने सांगितले. तर संपत कांबळे यांनी, व्याजाने पैसे घेवून बिल्डरकडे बुकिंग केले आहे. त्याचे व्याज भरताना नाकीनऊ येत आहेत, आता बिल्डरकडूनही टाळाटाळ होत असल्याने ते हवालदिल झाले आहेत.
हजारो ग्राहकांची फसवणूक
By admin | Published: August 24, 2015 2:42 AM