गणरायाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 06:12 AM2020-01-29T06:12:17+5:302020-01-29T06:19:18+5:30
एमआयडीसीतील गणपतीपाडा येथे गणपतीचे पुरातन मंदिर आहे.
नवी मुंबई : माघी गणेश जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सवांचे आयोजन केले होते. एमआयडीसीमधील रानातील गणपती मंदिरामध्ये दिवसभरामध्ये २५ हजारांपेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले. शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
एमआयडीसीतील गणपतीपाडा येथे गणपतीचे पुरातन मंदिर आहे. तुर्भे ग्रामस्थांसह नवी मुंबई व इतर ठिकाणावरूनही भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. माघी गणेश जयंती दिवशी यात्रेचे स्वरूप प्राप्त होत असते. यावर्षी चंद्रकांत रामदास पाटील यांच्या हस्ते पहाटे अभिषेक व पूजा करण्यात आली. दिवसभर तुर्भेगाव, शहाबाज, पावणेगाव, दारावेगाव व इतर ठिकाणच्या भजनी मंडळांच्या भजनाचे आयोजन करण्यात आले होते. २५ हजारांपेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. कोपरखैरणे सेक्टर ८ मध्ये गणेश कृपा मित्रमंडळ यांच्या वतीने उत्सवाचे आयोजन केले होते.
सीवूड सेक्टर ४८ मधील गणेश मैदानात माघी श्री गणेश जयंती उत्सव ट्रस्टच्या वतीने १४ वर्षांपासून गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. या वर्षीही दिवसभर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मंडळाचे संस्थापक सुमित्र कडू, अध्यक्ष राजेंद्र मोकल, समीर बागवान, प्रकाश राणे, विद्याधर महाडेश्वर व इतर पदाधिकाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले. नेरुळ रेल्वे स्टेशन समोरील श्री गणेश सोसायटीमध्ये २० वर्षांपासून जयंती उत्सवाचे आयोजन केले जाते. राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव आयोजित केला जातो. शिरवणेगाव, नेरुळ व शहरातील इतर मंदिरांमध्येही गणेशोत्सवानिमित्त भाविकांनी गर्दी केली होती.
उरणमधील गणेश मंदिरात भाविकांची गर्दी
माघी गणेशोत्सवानिमित्ताने उरण परिसरातील गणपती मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. केगाव-रानवड येथील पेशवेकालीन रिद्धिसिद्धी गणेश मंदिर, चिरनेर येथील महागणपती, सोनारी येथील गणेश मंदिर, मोठे नागाव येथील मंदिर आणि परिसरातील इतर ठिकाणच्या गणेश मंदिरात भाविकांची दर्शनासाठी सकाळपासूनच रांग लागली होती. पेशवेकालीन असलेल्या चिरनेर महागणपती आणि रानवड येथील रिद्धिसिद्धी मंदिरात पहाटे ३ वाजल्यापासून श्रीच्या दर्शनासाठी भाविक आले होते. सायंकाळपर्यंत भाविकांच्या गर्दीने मंदिराचे सभामंडपही भाविकांनी गजबजून गेले होते. उरण, पनवेल, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईसह भक्तांना येणाºया अनुभूतीमुळे रानवड आणि चिरनेर मुक्कामी येणाºया भक्तांमध्ये दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे.