नवी मुंबई : शहरात सोनसाखळी चोऱ्या करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने ३० गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली आहे. त्याच्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई झालेली असल्याने पोलीस त्याच्या शोधात होते.सादीकअली युसूफ सय्यद ऊर्फ जाफरी (२१) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तो सराईत सोनसाखळीचोर असून अनेक साथीदारांच्या मदतीने तो टोळी चालवत होता. या टोळीने अद्यापपर्यंत नवी मुंबई, मुंबई, ठाणे, नाशिक व पुणे परिसरात गुन्हे केले आहेत. यामुळे त्याच्या टोळीला मोक्का लावण्यात आलेला आहे. उपायुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या पथकाने महापे येथे सापळा रचून त्याला पकडले. तो आंबिवलीचा राहणारा असून, इराणी टोळीचा प्रमुख आहे. त्याचे अनेक साथीदार पोलिसांच्या हाती लागले होते. मात्र तो अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा देत होता. अखेर गुन्हा करण्यासाठी तो महापे परिसरात आला असता साहाय्यक निरीक्षक अजित शिंदे, हवालदार ज्ञानेश्वर बनकर, प्रवीण बावा, विजय पाटील, नवनाथ कोळेकर यांच्या पथकाने त्याला अटक केली. चौकशीत त्याने ३० गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यापैकी १३ गुन्ह्यांची उकल करून ६ लाख ४१ हजार रुपये किमतीचे चोरीचे दागिने जप्त केल्याचे अपर आयुक्त विजय चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उपायुक्त दिलीप सावंत, साहाय्यक आयुक्त राजेंद्र भामरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सोनसाखळीचोरांच्या टोळीप्रमुखास अटक
By admin | Published: January 05, 2016 2:09 AM