नवी मुंबईत रविवारी आठही विभागांत हजारो विद्यार्थी व नागरिक घेणार स्वच्छतेची शपथ
By योगेश पिंगळे | Published: September 16, 2023 05:10 PM2023-09-16T17:10:40+5:302023-09-16T17:11:04+5:30
'इंडियन स्वच्छता लीग' मध्ये मागील वर्षी सर्वाधिक युवक सहभागाबद्दल देशात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळविणारे शहर म्हणून नामांकित नवी मुंबई शहर यावर्षीही इंडियन स्वच्छता लीग २.० मध्ये सहभागासाठी नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज झालेले आहे.
नवी मुंबई : स्वच्छ शहर ही नवी मुंबईची ओळख येथील स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण देशात दृढ झालेली आहे. त्या अनुषंगाने ‘इंडियन स्वच्छता लीग २.’ अंतर्गत संपूर्ण नवी मुंबई शहरात स्वच्छतेची चळवळ उभी रहावी यादृष्टीने रविवार १७ सप्टेंबर २०२३ रोजी, बेलापूर ते दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात नागरिक एकत्र जमून स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण करणार आहेत. या माध्यमातून स्वच्छतेविषयी नवी मुंबईकर नागरिक किती जागरूक आणि उत्साही आहेत याचे प्रत्यंतर येणार आहेच त्यासोबतच नवी मुंबई शहरातील एकात्म भावनेचेही दर्शन घडणार आहे.
'इंडियन स्वच्छता लीग' मध्ये मागील वर्षी सर्वाधिक युवक सहभागाबद्दल देशात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळविणारे शहर म्हणून नामांकित नवी मुंबई शहर यावर्षीही इंडियन स्वच्छता लीग २.० मध्ये सहभागासाठी नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज झालेले आहे. याकरिता नवी मुंबई महापालिकेचा नवी मुंबई इको नाईट्स हा संघ कर्णधार पद्मश्री शंकर महादेवन यांच्या नेतृत्वाखाली सज्ज झालेला असून नागरिक नवी मुंबईच्या संघातील सहभाग नोंदवित आहेत. लीग अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून त्यामध्येही नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहे.
हा सामुहिक स्वच्छता शपथ ग्रहण उपक्रम आठ वॉर्डात एकाच वेळी सकाळी ठीक ८.०० वा. संपन्न होणार असून याठिकाणी सामुहिकरित्या शपथ ग्रहण एवढाच कार्यक्रम असणार आहे. या उपक्रमाच्या पूर्वतयारीविषयी आयुक्त नार्वेकर यांच्यामार्फत सातत्याने बैठका घेण्यात आल्या असून विभागप्रमुखांसह विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता व अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे विविध जबाबदा-या वाटून देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी आपल्या निवासस्थानापासून जवळच्या ठिकाणी स्वच्छ शहराविषयीची आपला अभिमान व्यक्त करण्यासाठी आणि देशात पहिल्या क्रमांकाच्या मानांकनाचे ध्येय साकारण्यासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन महापालिका आयुक्त नार्वेकर यांनी केले आहे.