नवी मुंबई : ओलाचालकाने भाडे नाकारल्याची तक्रार प्रवाशाला ५० हजाराला पडली आहे. त्याने गुगलवर ओलाच्या हेल्पलाइनचा नंबर मिळवून त्यावर फोन केला होता. या वेळी तक्रारीसाठी एक रुपये शुल्क भरण्यास सांगून फसव्या लिंकवरून ५० हजारांचा गंडा घातला. या प्रकरणी रबाळे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अक्षय कुंभार यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांनी बदलापूरला घरी जाण्यासाठी ओला अॅपवरून कार बुक केली होती; परंतु चालकाने कंपनीच्या निश्चित भाड्यापेक्षा जास्त भाड्याची मागणी केली. यामुळे दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला असता, चालकाने त्यांचे भाडे नाकारले. याची तक्रार करण्यासाठी अक्षय कुंभार यांनी गुगलवरून ओलाच्या हेल्पलाइनचा नंबर मिळवला. या वेळी फोनवरील व्यक्तीने चालकाविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी १ रुपये शुल्क भरण्यास सांगितले. त्याकरिता संबंधिताने अक्षय यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवली. ती लिंक ओपन करून अक्षय यांनी माहिती भरली असता, त्यांच्या बँक खात्यातून पाच वेळा ९,९९९ रुपये कापले गेले. ओलाचालकाच्या तक्रारीच्या प्रयत्नात ५० हजार रुपयांचा त्यांना गंडा बसला आहे. याबाबत त्यांनी बँकेकडे चौकशी केली असता, आॅनलाइन फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार अक्षय यांनी रबाळे पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार केली आहे.
५० हजारांचा प्रवाशाला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 5:34 AM