पालिकेतील साडेतीन हजार अभियंते ‘अस्वस्थ’
By admin | Published: July 12, 2016 03:12 AM2016-07-12T03:12:53+5:302016-07-12T03:12:53+5:30
नालेसफाई घोटाळ्यानंतर आता रस्ते घोटाळा प्रकरणातही अभियंत्यांना अटक झाल्याने मुंबई महापालिकेतील अभियंत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे़ कोणत्याही
मुंबई : नालेसफाई घोटाळ्यानंतर आता रस्ते घोटाळा प्रकरणातही अभियंत्यांना अटक झाल्याने मुंबई महापालिकेतील अभियंत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे़ कोणत्याही घोटाळ्यात वरिष्ठ अधिकारी नामानिराळे राहत असून अभियंत्यांच्याच गळ्याभोवती फास आवळला जात असल्याने अभियंतावर्ग हवालदिल झाला आहे़ त्यामुळे अभियंत्यांनी आपली ताकद दाखवून देण्यासाठी २० जुलैपासून काम बंद आंदोलनाची तयारी केली आहे़ याचा फटका अत्यावश्यक सेवांनाही बसण्याची शक्यता आहे़
रस्ते, पाणी, शहर नियोजन, घनकचरा व्यवस्थापन, इमारत प्रस्ताव अशा सर्व विभागांची सूत्रे अभियंत्यांच्या हाती असतात़ मात्र गेल्या काही वर्षांमध्ये कोणत्याही दुर्घटना अथवा घोटाळ्यानंतर वातावरण निवळण्यासाठी अभियंत्यांनाच सुळावर चढविले जात असल्याचा आरोप अभियंत्यांकडून होऊ लागला आहे़ सध्या गाजत असलेल्या रस्ते घोटाळ्यात दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता उदय मुरूडकर आणि रस्ते विभागाचे तत्कालीन प्रमुख अभियंता अशोक पवार यांना अटक करण्यात आली आहे़ या प्रकरणाचे तीव्र पडसाद अभियंत्यांमध्ये उमटू लागले आहेत़ एखाद्या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच त्यात वरिष्ठ अधिकाऱ्याचे पद धोक्यात आल्यास अभियंत्यांना निलंबित केले जाते़ (प्रतिनिधी)
अत्यावश्यक सेवांना टाळे : मुंबई महापालिकेच्या प्रमुख विभागांची सूत्रे अभियंत्यांकडे असतात़ महापालिकेत चार हजार तीनशे अभियंते आहेत़ अत्यावश्यक पाणी खात्यातही अभियंताच प्रमुख आहे़ त्यामुळे संतप्त अभियंत्यांनी काम बंद आंदोलन पुकारून अत्यावश्यक सेवांनाच टाळे लावण्याचा इशारा दिला आहे़ अभियंत्यांनी आझाद मैदानावर आज मोर्चा आणून आपली नाराजी दाखवून दिली असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका अभियंता कृती समितीचे पदाधिकारी यशवंत धुरी यांनी सांगितले़
दोन अभियंत्यांच्या अटकेविरोधात निदर्शने
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील रस्ते विभागामधील घोटाळ्याप्रकरणी दोन अभियंत्यांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत बृहन्मुंबई महानगरपालिका अभियंता संयुक्त कृती समितीने सोमवारी
आझाद मैदानात निदर्शने केली. दोन्हीही अभियंत्यांवर कोणतेही आरोपपत्र प्रशासनाने ठेवलेले नसून त्यापूर्वीच त्यांना अटक केल्याचा निषेध करत प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न कृती समितीने सुरू केला आहे. समितीने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने चौकशीसाठी अशोक पवार आणि उदय मुरुडकर या दोन अभियंत्यांना निलंबित केलेले आहे. मात्र त्यांच्या निलंबनाचा आधार घेऊन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान प्रत्येक रोडवर केवळ एक किंवा दोनच खड्डे घेतले गेलेले असून, निरीक्षण खड्डे हे आयआरसीच्या मानकाप्रमाणे नाहीत. त्यामुळे त्याआधारे कामामध्ये त्रुटी राहिल्या आहेत, असे म्हणणे सयुक्तिक होणार नाही. प्रत्यक्षात अभियंत्यांबाबतची चौकशी प्रथम महापालिकेमार्फत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. महापालिकेच्या चौकशीत जे निष्कर्ष समोर येतील, त्यावर महापालिकेतील सेवा नियमानुसार कारवाई होण्याची गरज समितीने व्यक्त केली आहे. मात्र प्रशासनाच्या बेजबाबदार कृतीमुळे महापालिकेतील अभियंते चुकीच्या पद्धतीने पोलिसांच्या कारवाईमध्ये भरडले जात असल्याचा आरोप समितीने केला आहे. त्यामुळे दिवसरात्र काम करणाऱ्या अभियंत्यांचे मनोबल खच्ची होणार आहे.
राजकीय साठमारीमध्ये अभियंत्यांना वेठीला धरू नये, असे आवाहन कृती समितीने केले आहे. नाहीतर अभियंत्यांनी उत्स्फूर्त आंदोलन केल्यावर मुंबईतील नागरी सुविधा बाधित झाल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा कृती समितीने दिला आहे.
रस्ते घोटाळ्याच्या चौकशीत काय?
रस्त्यांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे आढळून आले होते़ ३५२ कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस चौकशी समितीने केली आहे़ मात्र ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही त्यांना करोडो रुपयांचे कंत्राट मिळाले़ उच्च न्यायालयाने या प्रकरणात सुनावणीनंतर हे कंत्राट रद्द केले़, तर रस्ते विभागाचे तत्कालीन प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्यातील अधिकारी उदय मुरुडकर यांना पोलिसांनी अटक केली आहे़ या अधिकाऱ्यांची घोटाळ्यात भूमिका काय, किती कोटींचा त्यांनी अपहार केला, हे चौकशीतून पुढे येण्याआधीच ही कारवाई झाल्याचा आरोप कृती समितीने केला आहे़