इनॉर्बिट मॉल उडवण्याची धमकी, २३ शाखांना ई-मेल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 10:13 AM2024-08-18T10:13:09+5:302024-08-18T10:13:20+5:30
बॉम्बचा हा ई-मेल राज्यभरातील व राज्याबाहेरील इनॉर्बिटच्या २३ शाखांना केला असल्याचे समोर आले आहे.
नवी मुंबई : वाशीतील इनॉर्बिट मॉल बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल मॉल प्रशासनाला शनिवारी सकाळी आला. यामुळे बॉम्बशोधक व निकामी पथकासह पोलिस, अग्निशमन दल व इतर आपत्कालीन यंत्रणांनी त्याठिकाणी धाव घेतली. यादरम्यान संपूर्ण मॉल रिकामा करून प्रत्येक कानाकोपऱ्याची झाडाझडती घेण्यात आली. दरम्यान, बॉम्बचा हा ई-मेल राज्यभरातील व राज्याबाहेरील इनॉर्बिटच्या २३ शाखांना केला असल्याचे समोर आले आहे.
इनॉर्बिट व्यवस्थापनाला मॉलमध्ये बॉम्ब असल्याचा ई-मेल येताच त्यांनी वाशी पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. बॉम्बशोधक पथकासह पोलिसांनी मॉलच्या ठिकाणी धाव घेतली. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण मॉल रिकामा करण्यात आला. आलेल्या धमकीनुसार बॉम्बशोधक, श्वानपथकाने मॉलमधील दुकाने, कानाकोपऱ्यासह पार्किंगच्या जागेची झाडाझडती घेतली.
दुपारपर्यंत चाललेल्या तपासणीत काहीच समोर आले नाही. दरम्यान, असाच ई-मेल इनॉर्बिटच्या व राज्याबाहेर हैदराबाद, गुजरातमधील २३ शाखांना केला आहे. त्यावरून मॉलच्या माध्यमातून देशभरात तणाव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.