सांडपाणी वाहिनी तुंबल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 01:08 AM2020-01-03T01:08:42+5:302020-01-03T01:08:45+5:30
कळंबोलीत शाळेसमोरील प्रकार; सिडकोच्या दुर्लक्षामुळे हाल
कळंबोली : नवीन पनवेल येथील भारतीय मानव विकास ट्रस्ट संचालित बौद्धिक असक्षम (विशेष) मुलांची सेक्टर १ येथे शाळा आहे. या शाळेसमोरचे ड्रेनेज तुंबले आहे. सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सिडको वसाहतीत ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. याकडे सिडको दुर्लक्ष करीत असल्याने अशी परिस्थिती उद्भवत आहे. लवकरच उपाययोजना करण्याची मागणी पालक करत आहेत. नवीन पनवेल शबरी हॉटेलच्या पाठीमागे सेक्टर १ या ठिकाणी भारतीय मानव विकास ट्रस्ट संचालित बौद्धिक असक्षम मुलांची शाळा आहे. शाळेसमोरील रस्त्यावर सांडपाणी वाहिनी तुंबल्याने गेल्या आठ दिवसांपासून रस्त्यावर पाणी वाहत आहे, यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली असून विद्यार्थ्यांना ये-जा करताना अक्षरश: कसरत करावी लागते. अनेकदा मुले पडल्याने त्यांना दुखापतही झाली आहे.
मुलांना शाळेत सोडण्यास येणाऱ्या स्कूल व्हॅन, रिक्षा, दुचाकी याच ठिकाणी उभ्या राहत असल्याने विद्यार्थ्यांना सांडपाण्यातूनच ये-जा करावी लागते. शिवाय, चारचाकी वाहन गेल्यानंतर पादचाऱ्यांच्या अंगावर सांडपाणी उडते. याबाबत सिडकोकडे तक्रार करण्यात आली आहे. आठ दिवसांपासून ड्रेनेज तुंबले आहे; परंतु सिडकोकडून दुर्लक्ष होत असल्याचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे प्रसिद्धीप्रमुख संतोष आमले यांचे म्हणणे आहे. याबाबत लवकरच उपाययोजना करण्याची मागणी सिडकोकडे आमले यांनी केली आहे.
सिडकोने मान्सूनपूर्व कामे व्यवस्थित केली नसल्याने ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. त्याचबरोबर नालेसफाईही व्यवस्थित झालेली नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येऊन तळे साचत आहे. ठेकेदाराकडून वरवरचा गाळ साफ करण्यात आला आहे; परंतु माती, प्लास्टिक कचरा जैसे थे आहे. ड्रेनेज साफ करण्यासाठी सिडकोकडे प्रभावी यंत्रणा नसल्याने भाडेतत्त्वावर मशिनद्वारे काही प्रमाणात सफाई केली जाते.