एकाच दिवशी अपघाताच्या तीन घटना, दोघांची प्रकृती चिंताजनक; अपघात करणाऱ्या वाहन चालकांनी ठोकली धूम
By सूर्यकांत वाघमारे | Published: October 11, 2022 10:45 PM2022-10-11T22:45:08+5:302022-10-11T22:57:33+5:30
सोमवारी नेरुळ व तुर्भे एमआयडीसी याठिकाणी अपघाताच्या तीन घटना घडल्या आहेत. त्यापैकी दोन घटना दुचाकीस्वारांसोबत तर एक घटना पादचाऱ्यासोबत घडली आहे. याप्रकरणी नेरुळ व तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : शहरात तीन ठिकणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात तीन जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर तीनही अपघात करणाऱ्या वाहन चालकांनी अपघातानंतर वाहनांसह धूम ठोकली आहे.
सोमवारी नेरुळ व तुर्भे एमआयडीसी याठिकाणी अपघाताच्या तीन घटना घडल्या आहेत. त्यापैकी दोन घटना दुचाकीस्वारांसोबत तर एक घटना पादचाऱ्यासोबत घडली आहे. याप्रकरणी नेरुळ व तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ येथे राहणारे दर्शन पांडव हे दुचाकीवरून कुर्ला येथे कामासाठी चालले होते. त्यांची मोटरसायकल महापे जंक्शनला आली असता पाठीमागून आलेल्या कारने त्यांना धडक दिली. यामध्ये ते जखमी होऊन खाली कोसळले असता कार चालकाने त्याठिकाणावरून पळ काढला. अखेर तिथे जमलेल्या रिक्षा चालकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्याच परिसरात सुरेशसिंग परिहार यांना टेम्पोने धडक दिल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. परिहार हे मोटारसायकलवरून तुर्भे एमआयडीसी मध्ये जात असताना पाठीमागून आलेल्या टेम्पोने त्यांना धडक दिली. यामद्ये ते जखमी होऊन कोसळले असता जमलेल्या नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
तर नेरुळ येथे सोमवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास भरधाव रिक्षाने दिलेल्या धडकेत अरविंद कुंभार हे गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री बदलापूर येथे राहणारा त्यांचा भाऊ त्यांना भेटण्यासाठी आला होता. एकत्र जेवण केल्यानंतर अरविंद हे भावाला सोडण्यासाठी घराबाहेर गेले होते. यावेळी सेक्टर १२ येथे ते रस्त्यालगत उभे असताना भरधाव रिक्षाने अरविंद यांना जोराची धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर रिक्षकाचालक पळून जात असताना नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो हाती लागला नाही.