नवी मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्याच्या दृष्टीने नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून सक्षम प्रयत्न केले जात आहे. रुग्णांना विनाविलंब उपचार मिळावेत, या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्या या प्रयत्नांना बळकटी आणण्याचे मौलिक काम बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केले आहे. त्यांनी आपल्या आमदार निधीतून अत्याधुनिक सोईसुविधांनीयुक्त अशा तीन रुग्णवाहिका महापालिकेला दिल्या आहेत. सोमवारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.
रुग्णवाहिका या कार्डियाक रुग्णवाहिका असून, त्यात आॅक्सिजन सुविधा, बेसिक इंजेक्शन, स्ट्रेचर, प्राथमिक उपचार, फायर सीस्टिम, इमर्जन्सी रिस्पॉन्स फ्लॅशिंग लाइट आदी आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. खासगी रुग्णवाहिकांच्या मालकांची मुजोरी पाहता, तसेच रुग्णवाहिकांची वाढती मागणी लक्षात घेता, आमदार निधीतून या तीन रुग्णवाहिका महापालिकेसाठी उपलब्ध केल्याची माहिती मंदा म्हात्रे यांनी दिली. लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्या मतदार संघातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न आहेत. त्यामुळे आमदार निधीतून ५0 लाख रुग्णवाहिकांसाठी तर ५0 लाख व्हेंटिलेटरसाठी आमदार निधीतून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंदा म्हात्रे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
याप्रसंगी महापालिका नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यासह माजी सभापती संपत शेवाळे, महामंत्री विजय घाटे, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, सुनील पाटील, दीपक पवार, दत्ता घंगाळे, भरत जाधव , राजू तिकोणे व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.