वसई : वसई पोलिसांनी एका बंगल्यावर छापा टाकून दमणची तब्बल साडेतीन लाख रुपयांची चोरटी दारू जप्त केली. छाप्याची खबर मिळताच आरोपी पसार झाला आहे. सदर आरोपीला याआधीही चोरटी दारु विकल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. माजी मंत्री गणेश नाईक यांच्याशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत आरोपी चोरट्या दारुचा व्यापार करीत असल्याचे उजेडात आले आहे. वसई गावातील बेणापट्टी येथील ओनिल इनास डिमेलो यांच्या घरी दमणच्या चोरट्या दारुचा साठा असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी पहाटे चारच्या सुमारास छापा टाकला. यावेळी घरात साडेतीन लाख रुपयांची दमणची दारू आढळून आली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी ओनिल डिमेलो फरार झाला.दरम्यान, आरोपी डिमेलो याच्या घरातून याआधी किमान चार-पाच वेळा चोरटी दारु पकडण्यात आली होती. त्यावेळी त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही डिमेलो चोरटी दारु विकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. डिमेलो याची माजी मंत्री गणेश नाईक यांच्याशी तोंडओळख आहे. त्याचा गैरफायदा उचलत डिमेलो यांनी नाईक यांच्याबरोबर असलेला फोटो फे्रम करून घराच्या ओट्यावरील चौकटीत दिसेल अशा पद्धतीने लावलेला आहे. यातून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा डिमेलो याचा प्रयत्न असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. असे असले तरी याआधी डिमेलो याच्यावर कारवाई करून त्याचे मनसुबे उधळून लावण्यात आले होते. आज पुन्हा एकदा डिमेलोच्या घरात दमणची चोरटी दारू आढळून आली. डिमेलो याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी किंंवा आमचे नेते गणेश नाईक यांच्याशी कोणताही संंबंध नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी दिली.
वसईत साडेतीन लाखांची दारू जप्त
By admin | Published: December 22, 2016 6:39 AM