नवी मुंबई : ऐरोली येथील गोळीबारप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. व्यावसायिक वादातून हत्येच्या उद्देशाने आलेल्या टोळीत त्यांचा समावेश होता. मात्र मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून रबाळे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.रविवारी रात्री ऐरोली सेक्टर ९ येथे व्यवसायिक वादातून आदित्य क्षीरसागर याच्या हत्येच्या उद्देशाने त्याच्यावर गोळीबार झाला होता. हा हल्ला अमित भोगले याने केल्याचा दाट संशय आहे. क्षीरसागर व भोगले या दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असून मुलुंड येथील एका बांधकामाच्या साइटवरून गेली वर्षभरापासून त्यांच्यात खटके उडत आहेत. त्यातूनच क्षीरसागर याचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने भोगलेने त्याच्या हत्येचा कट रचल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु क्षीरसागरच्या हत्येच्या उद्देशाने आलेल्या ७ ते ८ जणांच्या टोळीने बंदुकीतून दोन राउंड झाडूनही तो बचावला.याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी हॉटेलमधील सीसीटीव्ही ताब्यात घेतले होते. त्याद्वारे सोमवारी रात्री तिघांना मुंबईच्या वेगवेगळ्या परिसरातून अटक करण्यात आली आहे. मंदार गावडे, साई घोगळे व नितेश साळवी अशी त्यांची नावे आहेत. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २२ जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांनी सांगितले.या तिघांचाही क्षीरसागरच्या हत्येसाठी आलेल्या टोळीत समावेश होता. मात्र या कटाचा संशयित मुख्य सूत्रधार भोगले अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून रबाळे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.>भोईर यांची चौकशीयादरम्यान सोमवारी सकाळपासून ठाण्याचे शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांची देखील पोलिसांकडून चौकशी सुरू होती. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चौकशीतूनही समाधान न झाल्याने ते देखील पोलिसांच्या संशयाच्या घेऱ्यात आहेत.
ऐरोलीतील गोळीबारप्रकरणी तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 5:27 AM