ज्वेलर्स लुटणाऱ्या टोळीच्या तिघांना अटक
By admin | Published: June 17, 2017 02:14 AM2017-06-17T02:14:47+5:302017-06-17T02:14:47+5:30
भिंतीला भगदाड पाडून दारावे येथील मयूरा ज्वेलर्समधील ५० लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. या गुन्ह्याची उकल करून नेरुळ पोलिसांनी सराईत टोळीच्या तिघांना
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : भिंतीला भगदाड पाडून दारावे येथील मयूरा ज्वेलर्समधील ५० लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. या गुन्ह्याची उकल करून नेरुळ पोलिसांनी सराईत टोळीच्या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला असून, सापडलेल्या रेल्वेच्या तिकिटावरून पोलिसांनी या टोळीचा शोध घेतला आहे.
दारावे येथील मयूरा ज्वेलर्सची भिंत फोडून ५० लाखांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. ज्वेलर्सच्या मागच्या बाजूला चाळीमध्ये भाडोत्री घर घेवून चोरट्यांनी दुसऱ्याच दिवशी त्याठिकाणी घरफोडी केली होती. सदर गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर नेरुळ पोलिसांनी एक महिन्याच्या तपासाअंती तिघांना अटक केली आहे. अटक केलेले तिघेही झारखंडचे असून देशभर त्यांच्या टोळीने गुन्हे केले आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेल्या ऐवजापैकी सुमारे पाच लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याचे सह आयुक्त प्रशांत बुरडे यांनी सांगितले. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांकडून ज्वेलर्सची तसेच गुन्ह्यासाठी भाड्याने घेण्यात आलेल्या घराची पाहणी करण्यात आली होती. यावेळी पोलिसांच्या हाती रेल्वेचे तिकीट लागले होते. सानपाडा ते सीवूड दरम्यानच्या प्रवासाचे हे तिकीट होते. यावरून पोलिसांनी सानपाडा रेल्वेस्थानकातील त्या दिवशीचे सीसीटीव्ही तपासले व घटना घडली तेव्हाचे सीवूड स्थानकातील सीसीटीव्ही तपासले. यावेळी ७ ते ८ संशयितांची माहिती नेरुळ पोलिसांच्या हाती लागली. यावरून उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे, वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भगुजी औटी, सहायक निरीक्षक सुशीलकुमार गायकवाड, राजेश गज्जल यांचे तपास पथक तयार करण्यात आले होते.
पथकाने सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या संशयितांची छायाचित्रे तयार करून त्यांच्याविषयीची माहिती मिळवली. त्यापैकी काही जण झारखंडचे असल्याचे समजल्यानंतर मागील १५ दिवस नेरुळ पोलिसांचे पथक त्याठिकाणी सापळा रचून होते. अखेर जामनगर येथून तिघांना ताब्यात घेवून चौकशी केल्यानंतर हा गुन्हा उघड झाला. यानुसार त्यांना अटक करण्यात आली असून, अशोक शर्मा (२९), सईद हुसेन नुर शेख (२२) व फिरोज इब्राहिम शेख (१९) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे इतर पाच साथीदार व चोरीचा माल घेणारे तिघे अशा ११ जणांचाही शोध सुरू असल्याचे पोलीस सह आयुक्त बुरडे यांनी सांगितले. एखाद्या ज्वेलर्सच्या बाजूचे घर अथवा गाळा भाड्याने मिळवून रात्रीच्या वेळी भिंत फोडून घरफोडी करण्याची त्यांची पध्दत आहे. अशाप्रकारे नवी मुंबईत यापूर्वी देखील काही ज्वेलर्स लुटल्याच्या घटना घडलेल्या आहेत.