सूर्यकांत वाघमारे
बांधकाम व्यवसायिक प्रवीण तायडेंच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. लोणावळा परिसरातून त्यांना अटक केली असल्याचं समजते. रबाळे पोलीसांच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून सदर ठिकाणी छापा टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बांधकाम व्यावसायिक प्रवीण तायडे यांची गुरुवारी गोळ्या घालून हत्या झाली होती. एक व्यक्तीसोबत ते मोटारसायकलवरून जात असताना पाठीमागून आलेल्या कारने त्यांना धडक दिली. त्यामध्ये तायडे खाली पडल्यावर कारमधील एकाने गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी तायडेंच्या डोक्यात लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येच्या घटनेनंतर काही तासातच संशयीत आरोपींची माहिती पोलिसांसमोर उघड झाली होती. त्यानंतर शुक्रवारी दुपारी कोपर खैरणे येथे गुन्ह्यात वापरलेली कार आढळून आली होती. त्यावरून जयेश पाटील व त्याच्या सहकाऱ्यांनी हत्या केल्याचे चित्र पोलिसांसमोर स्पष्ट झाले होते. यानुसार त्यांच्या अटकेसाठी गुन्हे शाखा व रबाळे पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते. अखेर रविवारी सकाळी लोणावळा परिसरातील मारेकरू लपलेले असल्याची माहिती रबाळे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लोणावळा परिसरातून जयेश पाटील व दोघा साथीदाराला अटक करण्यात आली आहे.
तायडे व पाटील यांच्यात सहा महिन्यापासून बांधकाम व्यवसायातील कामावरून वाद सुरु होते. यावरून त्यांच्यात सातत्याने खटके उडत होते. त्यामुळे तायडेंचा कायमचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला होता. गुरुवारी तायडेंच्या तळवली येथील अर्धवट स्थितीतल्या बांधकामाच्या ठिकाणी साचलेले पाणी उपसा करणारी मोटर बंद पडली होती. त्यामुळे मोटर दुरुस्तीसाठी एकाला घेऊन तायडे त्याठिकाणी आले होते. तिथून परत जात असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी फिल्मी स्टाईल ने पाठलाग करून गोळीबार केला होता. त्यांनतर गुन्ह्यात वापरलेली कार कोपर खैरणेत सोडून पळ काढला होता. हि कार पोलिसांच्या हाती लागल्यानंतर जयेश पाटीलवर संशय बळावताच पोलिसांनी त्याला इतर दोघांसह अटक केली. त्यांच्या विरोधात रबाळे पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यामध्ये इतरही कोणाचा हात आहे का याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.