नवी मुंबई : नेरुळ एमआयडीसीमधील दोन कंपन्यांना आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. यामध्ये कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, आग लागल्यानंतर अर्ध्या तासाने प्रत्यक्षदर्शीने अग्निशमन विभागाला कळवल्यानंतर बंब घटनास्थळी दाखल झाले.
मायक्रो पॅन फार्मासी या कंपनीत सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. सुरुवातीला कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आग आटोक्यात न आल्याने ती बाजूच्या इंडियाना कंपनीतही पसरली. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने एमआयडीसी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानुसार काही वेळात अग्निशमन दलाचे बंब त्या ठिकाणी दाखल झाले, तोपर्यंत ही आग इतर तीन कंपन्या व एका गॅरेजपर्यंत पसरली होती. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. अन्यथा परिसरातील इतरही काही कंपन्या जळाल्या असत्या.
आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन दलाने कंपनीच्या संबंधितांकडे चौकशी केली. त्या वेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी १०१ क्रमांकावर संपर्क साधल्याचे सांगितले. मात्र, संबंधित हेल्पलाइनकडे एमआयडीच्या अग्निशमन दलाचा संपर्काचा नंबर नसल्याने वेळेवर आगीची माहिती मिळू शकली नसल्याचे अग्निशमन अधिकारी सुरेश बोल्हार यांनी सांगितले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी तिथे सहा बंब दाखल झाले होते. त्यांच्या दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आग लागताच कंपनीच्या कर्मचाºयांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने कोणाला दुखापत झाली नसल्याचेही बोल्हार यांनी सांगितले.