महापेतील तीन कंपन्या जळून खाक; सात तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 02:24 AM2018-06-03T02:24:18+5:302018-06-03T02:24:18+5:30
महापे एमआयडीसी येथील पॅथोपॅक कंपनीला आग लागल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. ही आग लगतच्या दोन कंपन्यांमध्येही पसरल्याने तीनही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत.
नवी मुंबई : महापे एमआयडीसी येथील पॅथोपॅक कंपनीला आग लागल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. ही आग लगतच्या दोन कंपन्यांमध्येही पसरल्याने तीनही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. कंपन्यांमधील पुठ्ठे व केमिकलने पेट घेतल्याने सुमारे सात तासांनंतर ती आटोक्यात आली.
ऐरोली येथील एमएसईबीच्या सबस्टेशनला लागलेल्या आगीनंतर शनिवारी पहाटे शहरात आगीची दुसरी घटना घडली. यामध्ये महापे एमआयडीसीमधील तीन कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. पॅथोपॅक, मालविका व मॅच्युटॅक अशी तीन कंपन्यांची नावे आहेत. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास सुरुवातीला पॅथोपॅक कंपनीत आग लागली. या वेळी कंपनीतील कामगारांनी बाहेर पळ काढून स्वत:ला सुरक्षित करून घेतले; परंतु कंपनीतील कागदी पुठ्ठ्यांनी पेट घेतल्याने काही वेळातच आगीची तीव्रता वाढली. त्यामुळे ही आग लगतच्याच मालविका या कापड कंपनीपर्यंत पसरली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवाण्नांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याच्या कामाला सुरुवात केली; परंतु आग आटोक्यात येत नसल्याने त्यांच्या मदतीला महापालिका, सिडको, रिलायन्स यांचे अग्निशमन दलाचे बंदही घटनास्थळी दाखल होते. त्यांच्याकडून सुरू असलेल्या अथक प्रयत्नानंतर सुमारे सात तासांनंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत तीन कंपन्या जळून पूर्णपणे खाक झाल्याने कोट्यावधीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे; परंतु कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे अग्निशमन अधिकारी आर. बी. पाटील यांनी सांगितले. शिवाय, आगीचे कारणही अद्याप कळू शकले नसून, त्याच्या कारणांचा शोध घेतला जाणार असल्याचेही ते म्हणाले. आगीच्या या घटनेमुळे परिसरातील इतर कंपन्यांनाही धोका निर्माण झाला होता. औद्योगिक क्षेत्रातील सर्वच कंपन्या एकमेकांना लागून असल्याने एका कंपनीला आग लागल्यास ती शेजारच्या कंपनीपर्यंत पसरते. या दुर्घटनेतही आगीच्या ठिणग्या शेजारच्या कंपनीवर पडल्याने इतर दोन कंपन्यांपर्यंत आग पसरली.